ठेकेदाराअभावी रखडले होते काम; ८ कोटी ४३ लाख निधी मंजूर
गुहागर, ता. 13 : तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत गेली १२ वर्षे रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या गुहागर तालुक्यातील साखरीआगर येथील मच्छिमार जेटीचे काम सर्व अडथळ्यांची शर्यत पार करुन मंजूर झाले आहे. विशेष म्हणजे वाढीव निधी मंजूर होऊनही बांधकामासाठी कोणीही ठेकेदार पुढे येत नव्हता मात्र, आता मुंबईच्या एका कंपनीने कामाची वर्कआँर्डर स्वीकारल्याने जेटीच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून तिचे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याची माहिती पतन विभागाकडून देण्यात आली. Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon

साखरीआगर येथील मच्छिमारांना जेटी नसल्याने वर्षानुवर्षे अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत होते. जेटी नसल्याने होड्या नांगरणे, मासे उतरविणे शक्य होत नसल्याने परिणामी, रत्नागिरी तालुक्यातील जयगड बंदरामध्ये त्यांना आपल्या होड्या उभ्या करुन ठेवाव्या लागतात. त्यामुळे साखरीआगर ते जयगड हा प्रवास तसेच डिझेल वाहतूक करणे या सर्व बाबी फारच खर्चिक असल्याने त्यांचे फारच नुकसान होते. येथील मच्छिमारांची ही गैरसोय दूर करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या ठिकाणी जेटीला २०१०-११ मध्ये मंजुरी मिळाली होती. त्यावेळी तिच्या बांधकामाला २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. २०१२ मध्ये या जेटीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काम सुरु झाल्यानंतर सीआरझेडची परवानगी नसल्याचा मुद्दा पुढे आल्याने संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत सोडले होते. Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon

सीआरझेडच्या विळख्यात अडकलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारी बहुतांश ठिकाणी जेटींच्या कामांना मंजुरी होऊन कामे सुरुही झाली. मात्र, साखरीआगर जेटीचे बांधकाम गेली १२ वर्षे रखडल्याने गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी पाठपुरावा सुरु केला होता. दरम्यानच्या काळात या जेटीच्या कामाचा खर्चही वाढला. या सगळ्यांसाठी त्यांनी वारंवार संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठकाही घेतल्या होत्या. अखेर या कामातील अडसर ठरलेली सीआरझेडची परवानगी मिळून निधीही मंजूर झाला होता. मात्र, ठेकेदार मिळत नसल्याने जेटीचे काम गेले वर्षभर रखडले होते. Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon
बांधकामाचा खर्च तिप्पट
साखरीआगर जेटीच्या बांधकामाचा खर्च तिप्पटीने वाढला आहे. २०१०-११ मध्ये मंजूर झालेल्या या जेटीसाठी त्यावेळी २.९६ कोटी इतकी प्रशासकीय मंजुरी मिळालेली होती. मात्र, १२ वर्षाने या जेटीच्या बांधकामाला तिप्पट खर्च होणार आहे. यासाठी धूपप्रतिबंधक योजनेतंर्गत ८ कोटी ४३ लाख इतका निधी मंजूर झाला आहे. Construction of Sakhri Agar Jetty to start after monsoon
