कोकणात देखील रोजगाराची मोठी संधी; संतोष वरंडे
गुहागर, ता. 06 : तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये सलग चौथ्या वर्षी कॉमर्स फेस्ट उत्साहात संपन्न झाला. 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी यादरम्यान हा वाणिज्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. याचे बक्षीस वितरण नुकतेच जिल्ह्यातील विमा क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व श्री. संतोष वरंडे यांच्या हस्ते करण्यात आला. Commerce fest concluded at Patpanhale College
यावेळी बोलताना श्री. वरंडे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी कोकणात राहून देखील रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो. हे विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट करून सांगितले. रोजगार मिळवण्यासाठी महाविद्यालयात असतानाच कशाप्रकारे प्रयत्न करावे याची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. वाणिज्य महोत्सवामध्ये कॉमर्स क्वीझ, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, मार्केटिंग स्पर्धा, ऍडमॅड शो स्पर्धा अशा एकूण चार प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. प्रत्येक स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे मिळून 6000/ रुपये बक्षीस देण्यात आले. एकूण स्पर्धेसाठी 24 हजार रुपयांची बक्षीसे, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. Commerce fest concluded at Patpanhale College


पहिली स्पर्धा ही कॉमर्स क्वीझ घेण्यात आली. यामध्ये एकूण 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये सेजल सावंत, मनाली नाचरे आणि साहिल काताळकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. दुसरी स्पर्धा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन घेण्यात आली. यामध्ये 43 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेला परीक्षक म्हणून डीबीजे महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. ऋचा खवणेकर यांनी काम पाहिले. यामध्ये आदिती कुलकर्णी, साहिल आग्रे, दीक्षा पवार यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. या फेस्टचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मार्केटिंग स्पर्धा होय. यामध्ये एकूण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रत्येकी पाच विद्यार्थ्यांचे असे एकूण 22 गट तयार करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी ब्रँड तसेच नॉन ब्रँडच्या वस्तूंचे मार्केटिंग केले. यामध्ये प्रथम क्रमांक राज धोपट, द्वितीय क्रमांक ऋतुजा साळवी आणि तृतीय क्रमांक समर्थ किरवे आणि त्यांच्या सहकाऱ्यानी मिळवला. या स्पर्धेमध्ये बेस्ट सेल्स म्हणून फरहान कुंभार्लीकर यांने तर बेस्ट सेलर म्हणून निखिल टानकर याने क्रमांक मिळवला. Commerce fest concluded at Patpanhale College


यातील बहुतांश वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केल्या होत्या. प्रामुख्याने उकडीचे मोदक, घरगुती पापड, लस्सी, कोकणी भाजीपाला, खजूर लाडू, अगरबत्ती, चायनीज भेल तसेच गुहागर मध्ये उपलब्ध असणाऱ्या मासे आणि खेकड्यांचे देखील मार्केटिंग केले. या वस्तू गुहागर आणि चिपळूण तालुक्यातील 26 गावांमध्ये मार्केटिंग केले. चार दिवसांमध्ये या विद्यार्थ्यांनी साडेतीन लाखांच्या वर वस्तूंची विक्री केली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून उद्योजक श्री. विनोद पटेल आणि आबलोली महाविद्यालयाचे प्रा. सिताराम व्हनमाने यांनी काम पाहिले. Commerce fest concluded at Patpanhale College


या कॉमर्स फेस्टमधील अंतिम स्पर्धा म्हणजे ऍडमॅड शो स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये एकूण 65 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे स्वरूप सांघिक होते. यामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा साळवी ग्रुपने, द्वितीय क्रमांक नम्रता हळदे ग्रुपने आणि तृतीय क्रमांक प्रणया गावडे यांच्या ग्रुपने मिळवला. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मालानी मार्टचे मालक नदीम मालानी आणि प्रा. संजीव मोरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी अन्नपूर्णा हॉटेलचे मालक शामकांत खातू हे देखील उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुभाष खोत, कांचन कदम आणि सुभाष घडशी आणि महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळाने विशेष प्रयत्न केले. Commerce fest concluded at Patpanhale College