चिपळूणमधील १६५, गुहागरातील ११९, लांज्यातील ११६ गावे
गुहागर, ता. 29 : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२. अंतर्गत १८ ऑगस्टपर्यंत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्याने ग्रामीण स्वच्छता आणि आरोग्याच्या क्षेत्रात भरीव कामगिरी नोंदविली आहे. शासनाच्या या मोहिमेत चिपळूण, गुहागर आणि लांजा या तीन तालुक्यांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करत बाजी मारली आहे. Chiplun, Guhagar win in ODF Plus
जिल्ह्यातील १५३३ महसुली गावांपैकी तब्बल १५२० गावे आता ‘ओडीएफ प्लस’ (हगणदारीमुक्त अधिक) म्हणून ऑनलाईन घोषित झाली आहेत. जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायतींच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलत असून, आता अवघी १३ गावे ‘ओडीएफ प्लस’ होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. चिपळूणमधील सर्व १६५, गुहागरातील ११९ आणि लांज्यातील ११६ गावे पूर्णपणे ओडीएफ प्लस झाली आहेत. Chiplun, Guhagar win in ODF Plus
स्वच्छतेच्या दर्जानुसार गावांचे वर्गीकरण ‘अस्पायरिंग’, ‘रायझिंग’ आणि ‘मॉडेल’ अशा श्रेणींमध्ये करण्यात आले आहे. जिल्ह्यात २३४ गावे ‘अस्पायरिंग’, एक गाव ‘रायझिंग’ तर तब्बल १२८५ गावे सर्वोच्च अशा ‘मॉडेल’ श्रेणीत ऑनलाईन दाखल झाली आहेत. उर्वरित २४८ गावांना ‘मॉडेल’ श्रेणीमध्ये आणण्यासाठी सध्या वेगाने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासोबतच परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ही मोहीम मोलाची ठरत आहे. शिल्लक राहिलेली १३ गावेही लवकरच ओडीएफ प्लसचा टप्पा गाठतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. Chiplun, Guhagar win in ODF Plus