भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे मिळणार मोफत पाय
रत्नागिरी, ता. 14 : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय देण्यात येणार आहेत. याकरिता रत्नागिरीत २४ मे रोजी मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १०० दिव्यांगांनी नोंदणी केली आहे. अजूनही रत्नागिरी व नजीकच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोव्यातील दिव्यांगांनी नोंदणी केली नसल्यास त्यांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन भारत विकास परिषद दिव्यांग केंद्रातर्फे करण्यात आले आहे. Camp for the disabled in Ratnagiri
येत्या २४ मे रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात मोजमाप शिबिर होईल. याद्वारे गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. यापूर्वी अशी शिबिरे चिपळूण, मार्गताम्हाणे येथे आयोजित केली होती.
भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, शिबिर समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी आवाहन केले आहे की, अजूनही कोणी नावनोंदणी करायचे राहिले असल्यास लगेचच नोंदणी करावी. जेणेकरून त्यांच्या पायाचे मोजमाप शिबिरात घेता येऊ शकेल. गरजू दिव्यांगांनी त्वरित नोंदणी करणे आवश्यक आहे. Camp for the disabled in Ratnagiri
बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. हे पाय पारंपरिक जयपूर फूटपेक्षा अत्यंत वेगळे आणि प्रगत आहेत. वजनाने हलके आणि ‘ऑटोफोल्ड’ सुविधा असलेले हे पाय बसवल्यानंतर व्यक्ती केवळ चालूच शकते असे नव्हे तर धावणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामेदेखील सहजपणे करू शकतात. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तीचे परावलंबित्व संपून ती सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकणार आहे. Camp for the disabled in Ratnagiri
शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी श्री. कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा श्री. संजीव (७०२८०४५९५५) यांच्याशी संपर्क साधावा. स्कॉन प्रो. उद्योग समूहातर्फे शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहायकांसाठी मोफत भोजन, चहाची व्यवस्था करण्यात आली आहे. Camp for the disabled in Ratnagiri