वाचन संकल्प महाराष्ट्राचानिमित्त 1 ते 15 जानेवारी कालावधीत विविध उपक्रम
रत्नागिरी, ता. 27 : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयामध्ये 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कुवारबाव यांच्याद्वारे 30 डिसेंबर 2024 रोजी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करुन करण्यात येणार आहे. Book Exhibition at Ratnagiri Kuvarbav
वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तीमत्वाचे पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते. परंतु, अलिकडच्या काळात देशाचा तरुण वाचन संस्कृतीपासून दुरावत चाललेला असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे तरुण पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील वाचक व विद्यार्थी वर्ग यांना पुन्हा पुस्तकांकडे आकृष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्रंथ प्रदर्शन, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन शासकीय व सार्वजनिक ग्रंथालयाकडून 1 ते 15 जानेवारी या कालावधीत करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये स्थानिक वाचकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शशांक दि. नाईक यांनी केले आहे. Book Exhibition at Ratnagiri Kuvarbav