गुहागर, ता. 17 : तालुक्यातील बोर्या बंदरावर विसावण्यासाठी जाणारी हर्णे बंदरातील समुद्रात मच्छीमारीसाठी आलेली बोट तांडेलला आलेल्या डुलकीमुळे चक्क खडकावर चढून – अडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही. बोटीसह तांडेल, खलाशी असे सातहीजण सुखरूप आहेत. ही घटना गुहागर तालुक्यातील बोर्या समुद्रकिनारी देवीच्या डोंगरालगत बुधवारी मध्यरात्री 12 वाजता घडली. गुरुवारी दिवसभर बोट काढण्याच्या प्रयत्नाला यश आलेले नाही. मात्र बोटीमधील इंजिन काढण्यात आले असून यामध्ये सुमारे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले आहे. Boat climbed onto the rock
दापोली तालुक्यातील हर्णे येथील हरेश वासुदेव कुलाबकर यांच्या मालकीची जानकी इंडिया महाराष्ट्र 4 एमएम 1669 ही मच्छीमार बोट आहे. बुधवारी रात्री हर्णे बंदरातून गुहागरच्या समुद्रामध्ये जोराच्या वार्यामुळे बोर्या बंदरात विसावण्यासाठी येत होती. बोटीवर नरेश पालेकर हे तांडेल तर 7 खलाशी होते. समुद्रातून बोट बोर्या बंदरात आणताना देवीच्या डोंगराच्या बाजूने आणावी लागते. त्याप्रमाणे बोट आणत असताना तांडेलला डुलकी आली आणि बोटीच्या स्टेअरींगची साखळी तुटल्याने बोट थेट डोंगराच्या कडेला असलेल्या खडकावर जाऊन अडकली. ही घटना बुधवारी मध्यरात्री 12 वाजताची असून यावेळी सुरू असलेल्या भरतीमुळे बोट थेट खडकावर जाऊन अडकली. भरतीमुळे खडकाचा दणका मिळाला नाही. यामुळे बोट लगेच फुटली नाही. हे प्रसंगावधान राखून तांडेलसह 7 खलाशी सुखरूप खडकावर उतरले. Boat climbed onto the rock
दरम्यान या घटनेची खबर गुहागरचे मत्स्य परवाना अधिकारी स्वप्नील चव्हाण यांना मिळताच त्या ठिकाणी सागरी सुरक्षारक्षक रवाना केले. तसेच गुरुवारी दिवसभर खडकात अडकलेली ही बोट काढण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र त्याला यश आले नाही परंतु खडकावर आदळलेली ही बोट निकामी झाली असून बोटीतील इंजिन काढण्यात आले आहे. यात बोट मालकाचे सुमारे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले. Boat climbed onto the rock