गटनेते उमेश भोसले : सव्वातीन वर्षात शहरवासीयांच्या प्रश्र्नांकडे दुर्लक्षच
गुहागर, ता. 30 : आम्ही सत्तेत आहोत याचे आम्हांला समाधान मिळत नाही. कोणत्याच गोष्टींचे नियोजन नगराध्यक्ष करत नाहीत. आमचे नगरसेवक ज्या प्रभागामधुन निवडून आले त्या प्रभागांना अन्य प्रभागांच्या तुलनेत अत्यंत कमी निधी मिळतो. पाणी योजना, विकास आराखडा, स्वच्छ पाणी, खड्डेमुक्त शहर हे विषय मार्गी लागलेले नाहीत.त्यामुळे सत्तेतून बाहेर पडून विरोधी पक्षाच्या बाकावर आम्ही बसणार आहोत. अशी माहिती गुहागर नगरपंचायतीमधील भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी गुहागर न्यूजला दिली आहे.
(We are going to step out of power and sit on the benches of the opposition. – Umesh Bhosale, BJP Group Leader in Guhagar Nagarpanchyat)
4 ऑक्टोबरला गुहागर नगरपंचायतीमधील विषय समित्यांसाठी निवडणूक होणार आहे. मे 2018 मध्ये शहर विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून भाजप गुहागर नगरपंचायतीमध्ये 3 वर्ष 4 महिने सत्तेत सहभागी झाला होता. एका विषय समितीचे सभापतीपद भाजपकडे होते. मात्र आता भाजपने सत्तेतून बाहेर पडण्याचा आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
गुहागर तालुक्याला अभिमान वाटावा अशी बातमी : महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दिल्लीत गौरव
या बदलेलेल्या भुमिकेबाबत गुहागर न्यूजची बोलताना भाजपचे गटनेते उमेश भोसले म्हणाले की, गुहागर हे पर्यटनदृष्ट्या विकसीत होणारे शहर आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा हे भाजपच्या जाहीरनाम्यात होते. शहराचा विकास आराखडा जनतेला विश्र्वासात घेवून करणार हे भाजपच्या जाहीरनाम्यात होते. सव्वातीन वर्ष झाली तरी मंजुर असलेली पाणी योजना मार्गी लागत नाही. शहराला पावसाळ्यात गढुळ पाण्याचा पुरवठा होतो. विकास आराखडा गतीने तयार व्हावा म्हणून विशेष प्रयत्न होत नाहीत. कोरोनामध्ये नगरपंचायतीला गुहागर शहरातील नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यासाठी साधे कोविड केअर सेंटर उभे करता आले नाही. नगरपंचायत क्षेत्रातील खड्डे भरलेले नाहीत. हे शहरच्या विकासाचे मुद्देच आहेत ना. ते कोणाच्या जाहीरनाम्यात आहेत हा मुद्दा गौण ठरतो. परंतु त्याकडेही नगराध्यक्ष आणि शहर विकास आघाडी दुर्लक्ष करते. मग सत्तेत सहभागी राहून जनतेच्या विकासाकामांकडे दुर्लक्षच होणार असेल तर काय उपयोग.
निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना नगरपंचायतीचा कारभार कसा चालतो हे समजावे म्हणून शासनामार्फत अभ्यास दौरा आखला जातो. हा अभ्यास दौरा निवडणूक झाल्यावर पहिल्या सहा महिन्यात पूर्ण करणे ही नगराध्यक्षांची जबाबदारी असते. हा अभ्यास दौरा होण्यासाठी भाजप गटनेता म्हणून अनेकवेळा नगरपंचायतीकडे लेखी मागणी केली. परंतू त्याकडे नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले. कदाचित सर्व नगरसेवकांना नगरपंचायतीची कार्यप्रणाली समजली तर अडचणीचे ठरेल अशा भितीमुळे हा अभ्यास दौरा सव्वा तीन वर्ष झाली तरी पूर्णत्वास गेलेला नाही.
गेल्या सव्वा तीन वर्षात नगराध्यक्षांनी कोणत्याच विषयाचे नियोजन केले नाही. गुहागर नगरपंचायतीची विकास कामे शासनाच्या विविध योजनांमधुन नियमित मिळणाऱ्या निधीतून सुरु आहेत. परंतू विशेष निधी आणण्यासाठी नगराध्यक्षांनी स्वत:हून प्रयत्न केलेले नाहीत. उलट सत्ता मिळाल्यापासून शहर विकासाच्या कामांमध्ये निधीचा विनियोग केला नाही म्हणून निधी परत जाण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या. नुकताच स्मशानभुमी विकासासाठी वैशिष्ट्यपूर्ण मधुन आलेला सुमारे 1 कोटीचा निधी परत गेला. शहर विकास आघाडीचे नगरसेवक निवडून आलेल्या प्रभागांना दिलेला निधी आणि अन्य नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये दिलेल्या निधीचे प्रमाण व्यस्त आहे. एका बाजुला कोट्यवधीची कामे आणि दुसऱ्या बाजुला 40 ते 50 लाखाचा निधी असे आजचे शहराचे चित्र आहे. भाजप नगरसेवकांना दिलेला शब्द नगराध्यक्ष पाळत नाहीत. त्यामुळेच आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.