रत्नागिरी, ता. 19 : शहराजवळील पोमेंडी येथील देवराई परिसरात देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षण केले. यासाठी कीटकशास्त्रज्ञ सोनाली मेस्त्री मार्गदर्शक म्हणून लाभल्या होत्या. Bird-watching done by students of Dev, Ghaisas, Keer College


पोमेंडी येथे क्षेत्रभेटीत सुरवातीला सोनाली मेस्त्री यांची ओळख करून दिली. त्यांनी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीवेळी कोणते नियम पाळावेत व काय काळजी घ्यावी, याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर निवडलेल्या परिसराबद्दल व त्याठिकाणी मिळणाऱ्या सजीवांची त्यांनी माहिती दिली. या दरम्यानचा देवराई मधील परिसर फिरत असतानाच दिसणारे पक्षी, कीटक, घरटी यांचे सखोल मार्गदर्शन त्या करत होत्या. पक्ष्यांचा रंग, आकार, आवाज, शरीराची ठेवण, त्यांचे अन्न, खाण्याच्या पध्दती, अनेक जातींमधील फरक, त्यांचा वावर असणाऱ्या ठराविक जागा अशा सर्व दृष्टीकोनातून सोनाली मेस्त्री यांनी आवर्जून विद्यार्थ्यांना निरीक्षण करण्यास शिकवले. सर्पाची कात व ब्लू मॉर्मोन जातीच्या फुलपाखराचे पंख नमुना म्हणून घेतले गेले. प्रभावी पक्षी निरीक्षणासाठी दुर्बिण व कॅमेराचा उपयोग केला गेला. Bird-watching done by students of Dev, Ghaisas, Keer College


पोमेंडी परिसरामध्ये वेडा राघू, दयाळ, कोतवाल, चिरक, हळद्या, टकाचोर, सर्प गरुड, तपकिरी लाकूड घुबड, सुभग, करड्या डोक्याची मैना, करडा धोबी, पीतकंठी चिमणी असे अनेक पक्षी आढळले. या सर्व पक्ष्यांची विद्यार्थ्यांनी नोंद घेतली. यावेळी पोमेंडी येथे पक्षी अभ्यासक प्रसाद गोखले यांची देखील भेट झाली. त्यांनी पक्ष्यांची छायाचित्रे दाखवत काही वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणांना अशीच भेट देण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला दिला. या क्षेत्रभेटीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांचे विज्ञान शाखेचे विद्यार्थी व प्रा. सानिका कीर व प्रा. मनिषा मावडी तर माजी प्रा. दीपिका मयेकर उपस्थित होत्या. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आरती पाध्ये यांनी आभार मानले. Bird-watching done by students of Dev, Ghaisas, Keer College