चित्पावन मंडळ, सप्तसूर म्युझिकल्सतर्फे आयोजित
रत्नागिरी, ता. 01 : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ आणि सप्तसूर म्युझिकल्सच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ‘भक्तिरंग’ या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगले. युवा गायक अभिषेक काळे आणि गायिका सृष्टी कुलकर्णी यांनी बहारदार, आलाप, ताना घेत, सुस्पष्ट उच्चार आणि भक्तीरसपूर्ण गायनाने रसिकांनी मंत्रमुग्ध केले. Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri

जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर वसतिगृहाच्या सभागृहात ही मैफल झाली. सुरवातीला श्रीमती उषा काळे आणि एस. कुमार साऊंड सर्विसचे उदयराज सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि पांडुरंगाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक केले. वेळी कार्यकारिणी सदस्य अॅड. अविनाश काळे यांनी श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन कलाकारांना सन्मानित केले. मंडळाचे कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri

जय जय रामकृष्ण हरी गजराने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यानंतर एकाहून एक सर अभंग, भक्तिगीतांनी कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. पं. सुरेश बापट यांची शिष्या आणि संगीत विशारद सृष्टी कुलकर्णी हिने विष्णुमय जग, भेटी लागी जीवा, नाम गाऊ नाम घेऊ , रूप पाहता लोचनी हे अभंग लिलया सादर केले. तुझ्या मुरलीचा ध्वनी हे थोडे कठीण गीतही सृष्टीने सुरेख सादर केले. कार्यक्रमाची उंची वाढवत नेत पंढरपूरचे चित्र आणि संतांची मांदियाळी समोर उभी करण्यात दोन्ही गायक यशस्वी ठरले. पं. जयतिर्थ मेहुंडी यांचे शिष्य अभिषेक काळे याने विसावा विठ्ठल, माझे माहेर पंढरी, विठ्ठल विठ्ठल, जोहार मायबाप हे अभंग, गीते ताना घेत आणि गोड गळ्यातून अतिशय दर्जेदार रितीने सादर केले. भैरवी सादर करताना परब्रह्म भेटी लागी, कैवल्याच्या चांदण्याला आणि अगा वैकुंठीच्या राया हे तीन अभंग गुंफले. Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri
सलग नवव्या वर्षी ही मैफली झाली. यात निखिल रानडे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), निरंजन गोडबोले (संवादिनी), संतोष आठवले, पं. विश्वनाथ कान्हेरे (ऑर्गन) आणि सुहास सोहनी (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. अभ्यासपूर्ण निवेदन वामन जोग यांनी केले. Bhaktirang on the occasion of Ashadhi in Ratnagiri
