अजित आगरकर यांनी घेतली स्पर्धेची दखल, अथर्व दातार चमकला
गुहागर, ता. 17 : गुहागर ब्रह्मवृंद आयोजित भगवान परशुराम चषक 2025 (Bhagwan Parshuram Trophy 2025) या क्रिकेट स्पर्धेचे (Cricket) विजेतेपद नादब्रह्म कोल्हापूर या संघाने पटकावले. अश्र्वमेध पुणेबरोबर झालेल्या अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारत अथर्व दातारने विजेतेपद खेचून आणले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (BCCI Selection Committee Chairman Ajit Agarkar) यांनी या स्पर्धेसाठी केलेली रु. 50 हजारांची देणगी आणि आवर्जुन दिलेल्या शुभेच्छांनी या स्पर्धेला आणखी महत्त्व प्राप्त झाले.


गुहागरमधील ब्राह्मण समाजातील तरुणांनी एकत्र येत प्रथमच भगवान परशुराम चषक 2025 या स्पर्धेचे आयोजन केले होते. शहरातील चंद्रकांत खरे यांच्या मालकीच्या जागेत वीर सावरकर क्रिडानगरी उभारण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे, कर्जत, बीरवाडी, पेण, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, गोवा, कोल्हापूर येथील 18 संघ सहभागी झाले होते. शुक्रवार 14 मार्च ते रविवार 16 मार्च या तीन दिवसात 4 षटकांचे 43 सामने खेळविण्यात आले. रविवारी बाद फेरीचे सामने अत्यंत चुरशीचे झाले. नादब्रह्म कोल्हापूर आणि अश्र्वमेध पुणे यांच्यातील अंतिम सामना तर रोमहर्षक झाला. प्रथम फलंदाजी करताना अश्र्वमेध पुणे संघाने विजयासाठी 45 धावांचे उद्दीष्ट नादब्रह्म कोल्हापूर समोर ठेवले होते. 3 षटकांमध्ये नादब्रह्म कोल्हापूरच्या केवळ 29 धावा झाल्या होत्या. त्यामुळे विजयाचे पारडे अश्र्वमेध पुणेकडे झुकले होते. अंतिम षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 16 धावांचे लक्ष्य गाठताना 5 चेंडूत नादब्रह्मने 10 धावा केल्या. आता विजयासाठी 1 चेंडू 6 धावा असे समिकरण होते. फलंदाजी करणाऱ्या अथर्व दातारने षटकार ठोकण्यासाठी प्रेक्षकांकडून तब्बल 5 हजार रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली होती. आणि शेवटच्या चेंडूवर अथर्वने षटकार मारत नादब्रह्म संघाला विजय मिळवून दिला. Bhagwan Parshuram Trophy 2025


भगवान परशुराम चषकाचे मानकरी
अर्थवच्या खेळीमुळे नादब्रह्म कोल्हापूर स्पर्धेचा विजेता ठरला. या संघाला रु. 33 हजार 333 व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. उपविजेता ठरलेल्या अश्र्वमेध पुणे संघाला रु. 22 हजार 222 व आकर्षक चषक, शिवगणेश आले व कल्याणच्या संघाला प्रत्येकी 11 हजार 111 व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले.


अंतिम सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर होण्याचा मान नादब्रह्म कोल्हापूर संघाच्या अथर्व दातारने पटकावला. त्याला आयोजकांतर्फे सामनावीर म्हणून 1000 रु. व आकर्षक चषक, मालिकावीर म्हणून 2000 रु व आकर्षक देवून गौरविण्यात आले. तसेच अंतिम सामन्यातील शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्यासाठी 5 हजार रुपयांची बक्षिसे प्रेक्षकांनी जाहीर केली होती. ती बक्षिसेही यावेळी देण्यात आली.


स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुयश भट (अश्र्वमेध पुणे), सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून वैभव जोशी (नादब्रह्म कोल्हापूर), सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कौस्तुभ बिवलकर (अश्र्वमेध पुणे) यांना गुहागर ब्रह्मवृंद यांच्यातर्फे प्रत्येकी रु. 1000 व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले.


या राज्यस्तरीय स्पर्धेत पंच म्हणून रत्नागिरी क्रिक्रेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच महेंद्र भोसले व स्वप्नील धामणस्कर यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन समिर ओक, राहुल ओक, दिपक देवकर आणि सचिन कुलकर्णी चिपळूण यांच्याबरोबर अन्य क्रिक्रेटप्रेमींनी केले. स्पर्धेतील धावफलक (स्कोअर बोर्ड वही) लिहिण्याचे काम महेश दीक्षित यांनी केले. Bhagwan Parshuram Trophy 2025


अजित आगरकर यांच्याकडून कौतुकाची थाप
गुहागरमध्ये प्रथमच ब्रह्मवृंदांतर्फे भरविलेल्या भगवान परशुराम चषक 2025 या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची दखल थेट भारतीय क्रिक्रेट नियामक मंडळाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी घेतली. त्यांनी या स्पर्धेसाठी 50 हजार रुपयांची देणगी दिली. त्याशिवाय स्पर्धा सुरु असताना दूरध्वनीद्वारे थेट संपर्क साधून आयोजक व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. गुहागरसारख्या ठिकाणी ब्रह्मवृंदांनी राज्यस्तरीय स्पर्धा घेणे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. यावेळी केवळ आर्थिक मदत पाठवली असली तरी पुढच्यावेळी अशा स्पर्धेत सहभागी होवून आपल्या सर्वांच उत्साह वाढविण्यासाठी मी प्रयत्न करेन असे आश्र्वासन यावेळी अजित आगरकर यांनी दिले.


ऑनलाईन प्रसारणाचा सर्वाधिक लाभ
भगवान परशुराम चषक 2025 ही स्पर्धा यु ट्यूबवर पहात येत होती. तसेच लक्ष्मी नारायण केबल नेटवर्कद्वारे स्पर्धेचे थेट प्रक्षेपणही सुरू होते. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सामना पहाण्याचा आनंद लुटवा अशी व्यवस्था विविध क्रीडा स्पर्धांचे व्यावसायिक प्रक्षेपण करणाऱ्या tenniscricket.inlive या संस्थेद्वारे करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून भगवान परशुराम चषकातील सामने बघितले जात होते. दररोज 4 ते 5 हजार प्रेक्षक युट्यूबवरुन ही स्पर्धा पहात होते. इतकेच नव्हेतर अंतिम सामन्यात ऑनलाईन मॅच पहाणाऱ्या प्रेक्षकांनीही विजेत्या संघांवर बक्षिसांची लयलूट केली. थेट प्रक्षेपणाला सर्वाधिक सहभागिता मिळण्यामध्येदेखील या स्पर्धेने प्रथम क्रमांक पटकावला. Bhagwan Parshuram Trophy 2025


यशस्वी आयोजक : गुहागर ब्रह्मवृंद
दोन महिन्यांपूर्वी गुहागर शहरातील ठेकेदार प्रथमेश भागवत आणि कापड दुकानदार कौस्तुभ गद्रे यांनी ब्राह्मण समाजाची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरविण्याची कल्पना मांडली. शहरातील ब्राह्मण समाजातील तरुण मंडळींनी ही कल्पना उचलून धरली. तयारीला सुरवात झाली. निधीची उभारणी, मैदान तयार करणे असे काम सुरू झाले आणि हळुहळु ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुहागर तालुक्यातील ब्रह्मवृंदही सरसावले.


या स्पर्धेच्या आयोजनाचे कौतूक परगावातून आलेल्या खेळाडूंनी केले. स्पर्धेच्या ठिकाणी असलेली भोजन व्यवस्था, सीमा रेषांवर केलेली पाण्याची व सरबताची व्यवस्था, आयोजकांकडून प्रेमाने होणारी विचारपूस अशा विविध गोष्टींनी सर्वच खेळाडू भारावून गेले होते. प्रत्येक खेळाडू अन्य स्पर्धांच्या ठिकाणी असलेली व्यवस्थेची तुलना या स्पर्धेशी करुन आयोजकांची वाहवा करत होता.
खेळाडूंप्रमाणेच विविध समाजातील क्रिकेटप्रेमींनी देखील वीर सावरकर क्रीडानगरीला भेट दिली. गुहागर तालुक्यातील क्रिकेटप्रेमींच्या या स्पर्धेविषयी कुतुहल होते. राज्यस्तरीय स्पर्धा कुठे भरविणार, संघाची व्यवस्था कशी केली जाणार असे अनेक प्रश्र्न क्रिडाप्रेमींच्या मनात होते. त्यामुळे सावरकर नगरीला भेट देताना ही मंडळी उत्सुकतेने, कुतहलाने निरीक्षण करत होती. या सर्वांनी देखील स्पर्धेच्या आयोजकांचे कौतुक केले. Bhagwan Parshuram Trophy 2025