शेवटची मतदान यंत्रे रात्री 12 वाजता संकलीत
गुहागर, ता. 21 : बुधवारी मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान यंत्रे संकलनाचे कामे रात्री 1 वाजेपर्यंत सुरू होते. गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत निवडणूक यंत्रणेचे काम सुरु होते. 322 मतदान केंद्रांतील कौल असलेली मतदान यंत्रे केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अशी माहिती गुहागर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे. Assembly Elections
निवडणुका जाहीर झाल्यापासून शासनाकडून मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरळीत चालू रहावी म्हणून अथक परिश्रम घेतले जात आहेत. बुधवारी गुहागर मतदारसंघातील मतदानाचा महत्त्वाचा टप्पा पार पडला. कुलुपबंद झालेल्या मतदानाच्या पेट्या संकलनाचे काम लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात बुधवारी सायंकाळी 6.30 नंतर सुरु झाले. संकलन केंद्रापासून दूर असलेल्या मतदान केंद्रातील अधिकारी आणि मतपेट्या आणण्यासाठी एस.टी. बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. तर काही ठिकाणी खासगी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. गुहागर तालुक्यातील पडवे, तवसाळ या परिसरातील एस.टी. रात्री 12 वा. लवेलच्या संकलन केंद्रावर आली. तेथे मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट ताब्यात घेण्याची प्रक्रिया 1 वाजेपर्यंत सुरु होती. त्यानंतर आलेली मतदान यंत्रे, व्हीव्हीपॅट आदी यंत्रे सुरक्षा यंत्रणेच्या बंदोबस्तात सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरु झाले. मतमोजणीच्या नियोजनाप्रमाणे बुथनिहाय हे साहित्य स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आले आहे. या साहित्याच्या सुरक्षेसाठी केंद्रीय सुरक्षा दलातील सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री 1 नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची माहिती, अन्य माहिती संगणकीकृत करण्याचे काम सुरु झाले. हे काम पहाटेपर्यंत सुरु होते. संकलन केंद्रातील कर्मचारी पहाटे 4 वाजता या कामातून मोकळे झाले. Assembly Elections