निलेश सुर्वे
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील तवसाळ आगर येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात बाबर-तांबडवाडीतील वारकरी दिंडीच्या सहभागाने अधिकच द्विगुणीत झाला. Ashadi Ekadashi at Tavasal
गुहागर तालुक्यातील दक्षिण टोकाकडे असणारे तवसाळ आगर हे निसर्गरम्य छोटेखानी गाव. अरबी समुद्र आणि स्थानिक हद्दीवरील कोंड नदी यांच्या संगमावर 1955 साली कै. सिताराम भिकाजी शिलधनकर यांच्या पुढाकाराने विठ्ठल रुक्मीणी मंदिराची स्थापना झाली. तिथपासुन आजपर्यंत कमी लोकवस्ती असणाऱ्या या तवसाळ आगरमध्ये आषाढी आणि कार्तिकी एकादशीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या आषाढी एकादशीच्या दिवशी गावचे खोत उदय शिलधकर यांच्या घरातुन स्थानिक दिंडी निघते. गावात प्रत्येक उंबरठ्यामध्ये दिंडीची हजेरी लागुन दिंडी विठ्ठल मंदिरात येते. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मोठ्या मनोभावे पुजा करुन स्थानिक मंडळी सुश्राव्य भजन सादर करतात. दुपारच्या वेळी उपस्थित सर्व भाविक आणि वारकरी मंडळींसाठी फराळाची व्यवस्था देवस्थानकडुन केली जाते. या उत्साहपुर्ण वातावरणात साजरा होणाऱ्या आषाढी एकादशीचा उत्साह तवसाळ गावातील बाबर-तांबडवाडी येथील स्थानिक मंडळींनी जी वारकरी दिंडी देवळात आणली, त्याने अधिकच द्विगुणीत झाला. Ashadi Ekadashi at Tavasal
बाबरवाडी येथील ह. भ. प. शंकर बुवा यद्रे यांच्या विशेष पुढाकाराने गेली तीन वर्ष या दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडीमध्ये तवसाळ बाबरवाडीतील सर्व अबालवृद्ध हे मोठ्या उत्साहाने देवनाम घेण्यासाठी सहभागी होतात. तवसाळ बाबरवाडी येथुन या दिंडीची सुरुवात होते. त्यानंतर अटलवाडी, तांबडवाडी असा साधारणतः ३ किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी तवसाळ आगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात विसावते. या परिसरातील सर्व पांडुरंग भक्तांना अरबी समुद्र आणि कोंड नदीच्या संगमावर वसलेले हे मंदिर म्हणजे प्रति पंढरपुरच असल्याचा साक्षात्कार होतो. Ashadi Ekadashi at Tavasal
एकादशीच्या निमित्ताने ही दिंडी आयोजित करणारे ह. भ. प. श्री. शंकरबुवा येद्रे, सरपंच नम्रता निवाते, वनिता कुरटे, चंद्रकांत निवाते, सुरेश येद्रे, सुरेश नाचरे या वारकऱ्यांचा विठ्ठल रुक्मीणी देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. रात्री स्थानिक व परिसरातील भजन मंडळांची भजने सादर झाल्यानंतर पुन्हा ही दिंडी मंदिरातुन निघून खोत उदय भाटकर यांच्या निवासस्थानी पोहते. अशाप्रकारे आषाढी एकादशीच्या उत्सवाची पांडुरंग भक्तांनी सांगता केली. Ashadi Ekadashi at Tavasal