शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार
मुंबई, ता. 24 : आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेत आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा आदेश मागे घेतला असून आता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वार्षिक परीक्षा करण्यात आली आहे. तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येणार आहे. सरकारने नवीन शैक्षणिक धोरणानुसार हा निर्णय जाहीर केला आहे. Annual Examination for Class V and VIII Students

मुलांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करता येत नव्हते. पण आता नवीन शिक्षण धोरणानुसार आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचा निर्णय बदलण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षण हक्क कायदा २०११ मध्ये सुधारणा केली आहे. पाचवी आणि आठवी इयत्तेत आता वार्षिक परीक्षा घेण्यात येणार आहे. इयत्ता पाचवी आणि आठवी वार्षिक परीक्षेत विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास पुनर्परीक्षेचा विद्यार्थ्याला पर्याय असणार आहे. पुनर्परीक्षेतही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण झाल्यास इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गातच त्या विद्यार्थ्याला ठेवले जाणार आहे. Annual Examination for Class V and VIII Students

शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार पाचवीपर्यंत विद्यार्थ्यांना वयानुरूप वर्गात प्रवेश दिला जाईल. सहावी ते आठवीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना पाचवीच्या वर्गासाठी निश्चित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. याबाबत शासनाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये लिहिलं आहे की, महाराष्ट्रराज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा,पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल. यात पुढे लिहिलं आहे की, जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही,तर अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल. Annual Examination for Class V and VIII Students
