समुद्राला उधाण; सतर्कतेचा इशारा
रत्नागिरी, ता.01 : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यातील हवामानात मोठा बदल होत असल्याचं दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मुंबई, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर आता कोकणातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. याशिवाय समुद्राला उधाण आलं असून मुसळधार पावसामुळे कोकणातील जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. Alert warning due to heavy rain


मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यासह अन्य काही भागांमध्ये रात्री १२ वाजेपासून मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. सावंतवाडी, श्रीवर्धन, कुडाळ, गुहागर, दापोली, खेड, रत्नागिरी, मालवण, अलीबाग आणि महाड या भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याची माहिती आहे. कोलगाव, बांदा, माडखोल, आंबोली आणि इन्सुली या भागांमध्ये झाडांसह वीजेचे खांब तुटल्याची माहिती आहे. त्यानंतर आता वादळी वाऱ्यामुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. Alert warning due to heavy rain


उत्तरेतील राज्यांसह महाराष्ट्रातल्या मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. परंतु मुसळधार पावसाने अचानक लावलेल्या हजेरीमुळं कोकणातील अनेक ठिकाणच्या भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. भूस्खलनाची शक्यता असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होवू शकते, त्यामुळं नदीकाठी आणि डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Alert warning due to heavy rain