गुहागर पोलीस ठाण्याची कामगिरी,
गुहागर, ता. 26 : गुहागर तालुक्यातून बेपत्ता झालेल्या एका तरुणीचा शोध गुहागर पोलीसांनी 24 तासांमध्ये लावला. त्याबद्दल तरुणीच्या कुटुंबाने पोलीसांचे अभिनंदन केले आहे. 19 वर्षीय तरुणी गुहागरमधील ग्रामीण भागातून 21 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती.
गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर रामाणेवाडी येथील श्रुती संदिप रामाणे ही 19 वर्षांची मुलगी 21 सप्टेंबरला सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडली. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेल्या या मुलीने घरातून बाहेर पडताना काहीच सांगितले नाही. मात्र सदर तरुणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. त्याला वडिलांचा विरोध होता. भल्या सकाळी बाहेर पडून गेलेली मुलगी परत आली नाही म्हणून शोधाशोध झाली. आजुबाजुला श्रुती सापडली नाही. त्यामुळे घरच्यांनी सदर मुलांच्या घरी संपर्क साधला. तेव्हा श्रुती त्या मुलाबरोबर पळून गेल्याचे लक्षात आले.
दोन दिवसांनी मुलगी घरी परत येईल. विवाह केल्याचे सांगेल. अशा आशेवर घरची मंडळी होती. मात्र 24 सप्टेंबरपर्यंत श्रुती घरी परत आली नाही. तिच्या संदर्भात अन्य माहितीही मिळत नव्हती. त्यामुळे आपल्या मुलीसोबत काही विचित्र तर घडेल नसेल ना या कुशंकानी मुलीचे पालक अस्वस्थ झाले. मुलीचे वडिल संदिप रत्नाकर रामाणे यांनी अखेर 24 सप्टेंबरला गुहागर पोलीस ठाण्यात येवून मुलगी बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्याचबरोबर प्रेमसंबंधातून मुलगी पळून गेल्याचेही पोलीसांसमोर स्पष्ट केले. कायदेशीर दृष्ट्या ती सज्ञान असल्यामुळे आपण तिला परत आणू शकत नाही. मात्र ती नक्की कोठे आहे, ती सुखरुप आहे की नाही, याचा तपास पोलीसांनी घ्यावा. अशी विनंती संदिप रामाणे यांनी केली.
बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. मुलाच्या नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी टीम रवाना झाल्या. आलेल्या माहितीची सुत्रबध्द रचना करुन मुलगी कोणत्या परिसरात असु शकते याचे अंदाज लावण्यात आले. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांमध्ये संपर्क करण्यात आला. यासर्व गोष्टी वेगाने करुन पोलीस 24 तासांच्या आत थेट मुलीपर्यंत पोचले. या तपासकार्यात तपास प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांच्याबरोबर वैभव होळवे, गणेश पवार, गौरी शेटे हे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
पत्ता लागल्यानंतर सदर मुलीचे आणि पालकांचे पोलीसांनी बोलणे करुन दिले. मुलगी सज्ञान असल्याने तिची कोणतीही तक्रार नाही याचीही खात्री पोलीसांनी केली. ती सुरक्षित असल्याने पोलीसांनी हा तपास पूर्ण झाल्याची नोंद केली.