गुहागर, ता. 05 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे तवसाळ तांबडवाडीसह पडवे केंद्रातील सर्व शाळा आणि संपूर्ण गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. Honouring Madhavi Patil
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धती यांची दखल घेत श्रीमती माधवी मारुती पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. Honouring Madhavi Patil
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा तसेच शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी, रंजक आणि प्रभावी व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद आहे. माधवी मारुती पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही तवसाळ तांबडवाडीच्या आदर्श शाळेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. Honouring Madhavi Patil
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते सर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. तसेच शिक्षणप्रेमी श्री. सचिन कुळये यांनी दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंबई युवक मंडळाच्या वतीनेही त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Honouring Madhavi Patil