गुहागर, ता. 07 : विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळणेश्वर येथे मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरमहाविद्यालयीन प्रकल्प स्पर्धा ‘प्रकल्प २०२६’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या स्पर्धेत विविध २४ महाविद्यालयांमधून ७१ विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत आपले तंत्रज्ञानविषयक कल्पक प्रकल्प सादर केले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. Project Competition at Velaneshwar College
ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन, नाविन्यता आणि संशोधन वृत्तीला व्यासपीठ मिळवून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष व्यवहारात कसे आणावे, दैनंदिन सामाजिक व तांत्रिक समस्यांवर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने किफायतशीर उपाय कसे शोधावेत, याचे मोलाचे धडे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेतून घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सादरीकरण कौशल्य , संघकार्य आणि तांत्रिक चिकित्सक विचारसरणीचा विकास होण्यास मोठी मदत झाली. सादर करण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांचे परीक्षण प्रा. नंदकिशोर चौगुले आणि प्रा. विनोद साळुंखे यांनी केले. परीक्षकांनी प्रत्येक मॉडेलची तांत्रिक बाजू, सामाजिक उपयुक्तता आणि नावीन्य तपासून गुणांकन केले. Project Competition at Velaneshwar College
दुपारी नाना फडणवीस सभागृहात बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. यानंतर प्रा. डॉ. गणेश दिवे यांनी स्पर्धेचा सविस्तर आढावा सादर केला. त्यानंतर सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक प्राध्यापक व परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. Project Competition at Velaneshwar College
या स्पर्धेत माध्यमिक आश्रम शाळा, निवे बुद्रुकच्या सायली संतोष माने व दिया नरेंद्र लाड यांनी सादर केलेल्या ‘बहुउद्देशीय काठी (स्मार्ट स्टिक)’ या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. तर एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, सावर्डे येथील गार्गी थोरात व गार्गी पवार यांच्या ‘ऑटोमॅटिक प्लॅटफॉर्म कनेक्टर’ या प्रकल्पाने द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच ज्युनियर कॉलेज, मार्गताम्हाणे येथील सोम नरेश सावंत, प्रतीक प्रकाश शिगवण व प्रतीक प्रकाश दांदणे यांनी तयार केलेल्या ‘स्टार्क – स्कूल रिपोर्टिंग सिस्टीम’ या प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. Project Competition at Velaneshwar College
बक्षीस वितरणानंतर प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विजेत्यांचे व सर्व सहभागींचे कौतुक करत विद्यार्थ्यांना भविष्यातील संशोधनासाठी प्रोत्साहित केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनीही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत महाविद्यालयातील गुणवत्तापूर्ण शिक्षण व उद्योगाभिमुख उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. प्रज्वल मोहकर यांनी केले. शेवटी पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. Project Competition at Velaneshwar College
