जिल्हा एसटी विभागाचा निर्णय, आषाढीसाठी ६५ जादा एसटी बसेस
गुहागर, ता. 01 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी रत्नागिरी आगारासह इतर आठ आगारात तब्बल ६५ जादा एसटी बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी बसेसचे आरक्षण सुरू झाले आहे. जास्तीत जास्त वारकरी भाविकांनी ग्रुपने बसेस बुकिंग कराव्यात, असे आवाहन एसटी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच गावातून किमान ४० किंवा त्यापेक्षा अधिक वारकरी एकत्र आल्यास त्यांना थेट त्यांच्या गावातूनच पंढरपूरसाठी विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. Extra ST buses for Ashadhi
यंदाची आषाढी एकादशी २५ जुलैला होणार असून, वारीसाठी कोकणातून हजारो रत्नागिरीकर पंढरपूरला जात असतात. कोणी चालत तर कोणी खासगी बसेसने जातात. ज्यांना पायी जाणे शक्य नाही असे भक्त, वारकरी आपल्या लाडक्या लालपरीने प्रवास करत पंढरपूरला जातात. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास चांगला व सुखकर होण्यासाठी एसटीमहामंडळाच्या रत्नागिरी विभागातून दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही जादा एसटी बसेसचे नियोजन केले आहे. एसटी बसेसच्या आरक्षणाची सुरुवात झाली आहे. Extra ST buses for Ashadhi

महामंडळाच्या वेबसाईट, अॅपवर किंवा बसस्थानकावर आपण आरक्षण करू शकता. आषाढीवारीसाठी यंदाही ७५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास तर महिला, ६५ वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांना तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त सवलतीचा लाभ सवलतधारकांनी घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी ५१हून अधिक एसटी बसेस धावल्या होत्या. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून जास्तीत जास्त एसटी बसेस पंढरपूरला सोडण्यात येणार आहे. Extra ST buses for Ashadhi
