गुहागर, ता. 03 : तालुक्यातील पिंपर गावचा सुपुत्र कु. शुभम सुनिल रहाटे या खेळाडूची प्रो कबड्डी लीगमधील ‘बंगळूरु बुल्स’ संघात निवड झाल्याची आनंददायक बातमी समोर आली आहे. स्थानिक पातळीवरील श्री.विठ्ठलाईदेवी क्रिडा मंडळ अडूर व व्यावसायिक स्तरावर विजय क्लब मुंबई या संघांचे प्रतिनिधित्व करताना दाखवलेल्या उत्कृष्ट खेळामुळे त्याला ही सुवर्णसंधी प्राप्त झाली. ट्रायल्समध्ये फिजिकल फिटनेस, गेम सेंस, डिफेन्स/रेडिंग कौशल्य या मूल्यांकन आधारावर त्याची निवड करण्यात आली. सन २०१४ पासून सुरू झालेली प्रो कबड्डी लीग देशातील सर्वात मोठ्या क्रीडा लीग पैकी एक मानली जाते. आतापर्यंत आठ वेगवेगळ्या संघांनी विजेतेपद जिंकले आहे. Guhagar’s Shubham Rahate joins Pro Kabaddi


दि. ३१ मे आणि ०१ जून रोजी मुंबईत पार पडलेल्या खेळाडूंचे ऑक्शन मध्ये ‘बंगळूरु बुल्स’ संघामार्फत शुभमची निवड झाली. प्रो कबड्डी लीगचा यंदाचा बारावा सीजन आहे. शुभम याने आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुका, जिल्हा, राज्य आणि आता राष्ट्रीय पातळीवर झेप घेतली आहे. गुहागर तालुक्यातील पहिला खेळाडू शुभमच्या रूपाने प्रो कबड्डीमध्ये दाखल झाल्याने खेळाडूंमध्ये आता नवचैतन्य निर्माण झालं आहे. लवकरच इथून आणखी खेळाडू राष्ट्रीय स्तरावर झळकतील यात शंका नाही. हा खेळाडू केवळ स्वतःचीच नाही तर संपूर्ण तालुक्याची ओळख प्रो कबड्डीमध्ये नेतो आहे. ग्रामीण भागातूनही जागतिक पातळीवरचा खेळ खेळता येतो हे त्याने सिद्ध केलं आहे. त्याच्या दमदार खेळाने आता थेट प्रो कबड्डी लीगमध्ये आपल्या खेळाची चुणूक दाखवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. त्याच्या या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. Guhagar’s Shubham Rahate joins Pro Kabaddi