गुहागर, ता. 12 : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला उद्या गुरुवार दि.13 मार्च पासून सुरुवात होत आहे. या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरणार आहे. त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे, देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. Shimgotsavam of Talvali village deity
श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात. या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून गावभोवणीसाठी बाहेर पडतात. तसेच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात. यावेळी आंब्याचे झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे. यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. Shimgotsavam of Talvali village deity


यावेळी गुरुवार दि.13 रोजी पालखी मिरवणूक, शुक्रवार दि.14 रोजी सहाण भरणे, शनिवार दि.15 रोजी मानकरी घरे घेणे, रविवार दि.16 रोजी शिगवणवाडी व रेडीज मंडळी घरे घेणे, सोमवार दि.17 रोजी पालखी बैठी सहाण/ब्राम्हणवाडी,मंगळवार दि.18 रोजी पालखी बैठी, बुधवार दि. 19 रोजी भेळेवाडी, गुरुवार दि.20 रोजी भडकंबावाडी, शुक्रवार दि.21 रोजी आगरवाडी नं.1, शनिवार दि.22 रोजी देऊळवाडी, रविवार दि.23 रोजी आगरवाडी पूर्व, सोमवार दि.24 रोजी श्री सुकाई देवी आणि श्री झोलाई देवीचा पालखी भेट सोहळा, मंगळवार दि.25 रोजी डावलवाडी, बुधवार दि 26 रोजी सावंतवाडी, गुरुवार दि.27 रोजी चिंचवाडी, शुक्रवार दि. 28 रोजी देवीचा गोंधळ, शनिवार दि.29 रोजी पालखी क्षेत्रफाळ, रविवार दि.30 रोजी गुढीपाडवा त्यानंतर पालखी मंदिरात जाऊन या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे. या शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीने केले आहे. Shimgotsavam of Talvali village deity