रत्नागिरी, ता. 04 : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे शाळेत निवासी शिबीर रंगले. यावेळी विविध प्रकारच्या सहशालेय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कलाकार श्रीकांत ढालकर यांचा बहुढंगी कार्यक्रम, कलाशिक्षक संतोष गोरिवले यांची कला आणि कार्यानुभव कार्यशाळा, गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्रा. बाबासाहेब सुतार यांनी रात्री आकाशदर्शन कार्यक्रम केला. लोकमान्य टिळक जन्मभूमीला भेट ही क्षेत्रभेट, सहभोजन, भेळीचा आस्वाद, विविध गुणदर्शन व शेकोटीचा कार्यक्रम आणि झुंबा डान्स, व्यायामाने कार्यक्रमाची सांगता झाली. Residential camp at Agashe Vidyamandir
शिबीर होण्यासाठी शाळेने उत्तम नियोजन केले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह प्रचंड होता. पालकांनी शिबीर उपक्रमाचे मनापासून स्वागत केले व आपला सहभागही दिला. लहान मुलांसाठी निवासी शिबीर ही एक वेगळी अनुभूती होती. विशेष सहाय्य माजी नगरसेवक राजू तोडणकर यांचे लाभले. शिबिराला शाळा समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, प्रबंधक विनायक हातखंबकर, शाळा समिती सदस्य धनेश रायकर, माजी मुख्याध्यापिका शीतल काळे आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके, योग्य नियोजन मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम, ज्येष्ठ शिक्षिका सौ. भारती खेडेकर, गीता सावंत, सुधीर शिंदे, सर्व वर्गशिक्षक चारुशीला पेठे, सुरभि सावंत, जोत्स्ना सागवेकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले. Residential camp at Agashe Vidyamandir
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी रात्री आठ वाजता शिबीर उपक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. मराठी माध्यमाच्या शाळेचे कामकाज जाणून घेऊन त्यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक केले. आकाशदर्शन कार्यक्रमात तारे, ग्रहांचे दर्शनही श्री. पुजार यांनी घेतले. शाळेचे नियोजन खूप चांगले असून विद्यार्थीही हुषार असल्याचे त्यांनी सांगितले. डाएटचे प्राचार्य व शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सुशील शिवलकर हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. प्राथमिक शाळेच्या नव्या इमारतीची माहिती मान्यवरांना देण्यात आली. मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. Residential camp at Agashe Vidyamandir