विहिरीची अर्धवट खोदाई, जैन इरिगेशन पाईपचे मागणी अपूर्ण; ग्रामस्थांचे आजपासून साखळी उपोषण सुरु
गुहागर, ता. 01 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात जलजीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक नळपाणी योजना अपूर्ण कामामुळे वारंवार ग्रा.पं मार्फत पाठपुरावा करून सुद्धा काम पूर्ण होणेबाबत कोणतीच कार्यवाही मक्तेदाराकडून झालेली नाही. याबाबत गुहागर पंचायत समिती यांना वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. परंतु प्रशासनाकडूनही कोणतीही ठोस कार्यवाही अद्याप पर्यंत आलेली नाही. तरी नळपाणी योजनेचे मक्तेदार मे. भिवाई कन्स्ट्रक्शन हे प्रत्यक्ष जोपर्यंत उपोषणाच्या ठिकाणी चर्चेला येत नाहीत व नळपाणी योजनेची अपूर्ण कामे पूर्ण करणेबाबत तात्काळ प्रत्यक्ष कार्यवाही जोपर्यंत मक्तेदार करत नाहीत. तोपर्यंत आज बुधवार दि.१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० वा. पासून गुहागर पंचायत समिती कार्यालयासमोर वरवेली ग्रामस्थ व वरवेली ग्रामपंचायत साखळी उपोषणास बसले आहेत. Chain hunger strike of Varveli villagers
वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेच्या कामा संदर्भात सुरुवातीपासून अनेक शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेचे उर्वरित काम ग्रामस्थांच्या मागणीनुसार त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित ठेकेदार व पंचायत समिती पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून ही ग्रामस्थांच्या मागणीनुसार काम होत नाही. तसेच जैन इरिगेशनची पाईपलाईन टाकण्यासंदर्भात ग्रामस्थांची मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्याचप्रमाणे मोडकाआगर धरणालगत जुन्या विहिरीच्या एकदम शेजारीच नवीन विहिरीची खोदाई ठेकेदाराने पावसाळ्या अगोदर केली होती. त्यावेळी अनेक वेळा विहिरीचे उर्वरित बांधकाम कधी करणार असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात होता. पावसापूर्वी विहिरीचे काम पूर्ण करणे गरजेचे असताना देखील याकडे ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले वरवेली येथील जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये गावातील नागरिकांनी जैन इरिगेशन पाईप व लक्ष्मी कंपनीचा पंपची केलेली मागणी संबंधित ठेकेदाराने धुडकारली होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीतील गट विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्याचप्रमाणे स्थानिक आमदार यांना जैन इरिगेशन पाईपची मागणी संदर्भात पत्रव्यवहार केला होता. परंतु ग्रामस्थांच्या मागणीचा कुणीच गांभीर्याने विचार केला नाही. Chain hunger strike of Varveli villagers


ठेकेदाराने फक्त मुख्य विहीर ते साठवण टाकी पर्यंतच जैन इरिगेशनचा पाईपचा वापर केला आहे. गावांतर्गत पाईपलाईन टाकताना जैन इरिगेशनचा पाईप न वापरता शक्ती पॉलिमर या कंपनीचा पाईप वापरला गेला आहे. या संदर्भात अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये नागरिकांनी तक्रारी करूनही कुठल्या प्रकारची दखल घेतली नसल्याचे दिसत आहे. मुख्य पाईप लाईन टाकताना ठेकेदाराने रस्त्याच्या शेजारून पाईपलाईन टाकली आहे. मोडकाआगर ते वरवेली फाटा या मार्गावर रस्त्याच्या शेजारीच पाईपलाईन टाकण्यात आली आहे. रस्त्याचे रुंदीकरण करताना डांबरीकरण केलेल्या रस्त्याच्या खाली पाईपलाईन गेली आहे. पाईप जमिनीमध्ये साधारणपणे तीन फूट असेल असे अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. परंतु तो पाईप दोन फुटावर टाकण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. यापुढील वरवेली फाटा ते सर्व साठवून टाकी पर्यंत टाकण्यात आलेली पाईपलाईन ही सुद्धा रस्त्या या शेजारी टाकण्यात आली आहे. पाईपलाईनला लावण्यात आलेले एअर व्हाल रस्त्याच्या शेजारी असल्याने दुसऱ्या वाहनाला जागा देताना संबंधित एअर व्हाल तुटण्याची शक्यता भविष्यात नाकारता येत नाही. रस्ता शेजारून पाईपलाईनला ग्रामस्थानी विरोध केला होता परंतु ग्रामस्थांचा असलेला विरोध झुकारून पाईपलाईन टाकण्यात आली आहे. Chain hunger strike of Varveli villagers
या मुख्य पाईपलाईन संदर्भात लोकांच्या तक्रारी असताना देखील संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याची माहिती ग्रामपंचायतला देखील नसल्याने ग्रामपंचायत सुद्धा या संदर्भात कुठलेही उत्तर देऊ शकत नाही. जैन इरिगेशन पाईप टाकल्या संदर्भात ठेकेदार लक्ष देत नसल्याचे दिसत असल्याने तक्रारग्रस्त नागरिकानी नाईलाजास्तव शक्ती पॉलिमर कंपनीचा पाईप टाका व काम पूर्ण करा असे सांगितले होते. परंतु जानेवारी महिना उजाडला तरी. अद्यापही जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी योजनेचे काम सुरू झाले नसल्याचे दिसत आहे. एकंदरीत विहिरीचे असलेले अर्धवट काम, जैन इरिगेशन पाईपची असलेली नागरिकांचे मागणी, लक्ष्मी कंपनीचा पंप या संदर्भामध्ये वरवेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. सकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. प्रमोद केळसस्कर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. Chain hunger strike of Varveli villagers