केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध
नागपूर, ता. 19 : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध महाविकास आघाडी आक्रमक झाली असून आघाडीच्या आमदारांनी आज गुरुवारी विधानभवन परिसरात आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल देशाच्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरे यांनी केली. हा केवळ आंबेडकरांचा नाही, तर देशाचा अपमान असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. Protest in Vidhan Bhavan area
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवन परिसरात आंदोलन करण्यात आले. निळी टोपी आणि निळा गमछा घालून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. सुरुवातीला संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. त्यानंतर तेथून मविआचे आमदार सभागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारातून विधानभवनात आले. ‘बाबासाहेबका अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान’ अशा जोरदार घोषणा देत विरोधकांनी विधानभवन परिसरात गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. यावेळी सर्व आमदारांनी निळ्या टोप्या व दुपट्टे परिधान केले होते. ‘बाबासाहेब आंबेडकर… बाबासाहेब आंबेडकर…’ असा निरंतर जपदेखील महाविकास आघाडीच्या आमदारांनी केला. ‘एकच साहेब, बाबासाहेब’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अभिजित वंजारी, भाई जगताप, सचिन अहिर, डॉ. नितीन राऊत, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, रोहित पवार, गीता गायकवाड, भास्कर जाधव आदी आमदारांची उपस्थिती होती. Protest in Vidhan Bhavan area
भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या देशातील कोट्यवधी लोकांचे देवच आहेत, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. ज्यांना कधी अधिकार क्षेत्र, माणुसकी, मानवता माहीत नव्हती, त्यांना माणून बनवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. भाजपवाल्यांनी देवळातील देव शोधला, पण बाबासाहेबांनी माणसातला देव शोधला. बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना जगण्याचा अधिकार दिला. ज्यांच्या घरात सूर्यप्रकाश नव्हता, त्यांना प्रकाश देण्याचे काम केले. ज्यांच्या घरात अंधार होता, त्यांना उजेड देण्याचे काम करणाऱ्या अशा महामानवाचा अपमान कदापी सहन करू शकणार नाही, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. Protest in Vidhan Bhavan area
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल देशाच्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी विजय वडेट्टीवार यांनी केली. डॉ. बाबासाहेबांचा अपमान म्हणजे देशातील दीन, दलित, ओबीसी, बहुजन अशा करोडो लोकांचा अपमान आहे, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळे आम्ही निषेध करत असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. या आंदोलनावेळी आदित्य ठाकरे यांनीही भाजप आणि अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. गेले दोन दिवस भाजपकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होत आहे. हा केवळ आंबेडकरांचा नाही, तर देशाचा, देशाच्या संविधानाचा, प्रत्येक नागरिकाचा अपमान झालेला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला त्याचा न्याय हक्क, त्यांचे अधिकार सांगितले. जनसामान्यांचा आवाज सत्तास्थळी पोहोचवला. जीवन नरकापेक्षाही भयानक असणाऱ्या लोकांना बाबासाहेबांनी जगण्याचा मार्ग दाखवला. अमित शहा यांनी बाबासाहेबांबाबत जे वक्तव्य केले, त्यासाठी माफी मागायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. जर ते बोलले नसतील, तर तसे त्यांनी समोर येऊन सांगायला पाहिजे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी दिले. Protest in Vidhan Bhavan area