गुहागरच्या रिद्धी रहाटे ठरल्या विजेत्या
गुहागर, ता. 03 : गुहागर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी अडूर गावी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम व समाजातील महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘खेळ पैठणीचा, सन्मान नारी शक्तीचा’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अडूर तेली समाज ज्ञाती बांधव यांच्या वार्षिक कार्यक्रमाचे यंदाचे २५ वे वर्ष होते. या रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘खेळ पैठणीचा’ या कार्यक्रमात महिलांनी उत्साहाने सहभागी नोंदविला. यामध्ये तालुक्यातील समाज बांधवांची लाभलेली उपस्थिती लक्षवेधी ठरली. Game of Paithni at Adur
या स्पर्धेत एकूण ५५ महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये उखाणे, संगीत खुर्ची, चेंडू फेकणे, फुगे फुगवून फोडणे, ग्लासचे मनोरे करणे, बिस्कीट खाणे अशा वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. सोबतीला संगीताचा ठेका अन् निवेदन व प्रेषकांचा उत्साह यामुळे स्पर्धा उत्तरोत्तर रंगतदार ठरली. अठरा वर्षांपासून ते सत्तर वर्ष वयापर्यंतच्या स्पर्धक स्पर्धेत होत्या. स्पर्धेत शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्यांना विजेते घोषित करण्यात आले. Game of Paithni at Adur
यामध्ये प्रथम क्रमांक विजेत्याच्या मानकरी सौ. रिद्धी प्रविण रहाटे (गुहागर) ठरल्या. विजेत्यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक सौ.प्रांजल आश्रय पवार (वरवेली) आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी सौ.वैशाली प्रतिक रहाटे (वेळंब) यांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षिसांची संपूर्ण स्पॉन्सरशिप श्री.नारायण शंकर झगडे (अडूर) यांच्याकडून तर लकी ड्रॉ ची सर्व बक्षिसे श्री. विलास चंद्रकांत किर्वे (वरवेली) यांच्या कडून प्राप्त झाले. तसेच या कार्यक्रमाचे समन्यवक म्हणून स्वप्नील सुधाकर झगडे (अडूर) यांनी काम पाहिले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गुहागर तालुका तेली समाज सेवा संघ तसेच अडूर तेली समाज ज्ञाती बांधव व महिला वर्गाचे विशेष सहकार्य लाभले. Game of Paithni at Adur