Guhagar News : स्वामीजी समजून घ्यायचे तर तीन तप समजून घेतले पाहिजेत. त्यांचे ‘बालपण’, ‘संन्यास दीक्षा’ आणि ‘मुक्ती लढ्यातील नेतृत्व’. कारण या तिन्ही तपातील स्वामीजी तपस्वी आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असलेले सिद्ध पुरुष दिसून येतात. स्वामीजींच्या जीवनाकडे पाहिले तर एका विशिष्ट व पवित्र राष्ट्र कार्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता असे लक्षात येते. Swami Ramanand Tirtha
निजाम आणि इंग्रजांच्या तावडीतून हैदराबाद संस्थान मुक्त करण्यासाठी शेकडो वर्षांपासून स्थानिक हिंदूंचा संघर्ष सुरू होता. पण तो असंघटित होता. त्यामुळे प्रत्येकवेळी इंग्रज दडपून टाकत होते. 1818 मध्ये मराठेशाहीला तलवार खाली ठेवावी लागली तेव्हापासून संपूर्ण समाजाला सोबत घेणारे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारे नेतृत्व हिंदू समाजाला मिळत नव्हते. स्वामीजींनी हीच मोलाची कामगिरी पार पाडली. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचा हिस्सा बनून सर्व समाजाला एकसूत्रात बांधले. राजकीय लढ्यासोबत त्यांनी सामाजिक जागृतीसुद्धा आपल्या कृतीतून समाजाच्या लक्षात आणून दिली. अस्पृश्यता, जातीभेद, उच्चनिचता या दुर्गुणांमुळे आपण आज परदास्यात आहोत याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच व्रतस्थ संन्यासी असूनही कधीही पंक्तीला बसताना त्यांनी आपल्या सोबत कोणत्या जातीचा आणि पातीचा व्यक्ती बसला आहे याचा विचार केला नाही. Swami Ramanand Tirtha


समरसमय जीवन पद्धती
खेडगीकर अंबाजोगाई येथे वसतिगृहात शिक्षक म्हणून सेवा देत असताना सर्वांना एकत्र भोजन करायला लावत असत. एकदा आपले गुरू स्वामी रामतीर्थ यांच्या जयंतीला वसतिगृहाच्या बाहेर कार्यक्रमातही ब्राह्मण व ब्राह्मणेतर असे सर्वांना जेवायला बसवले. वसतिगृहात चालायचेच, पण गावातही अशा एकत्र पंगती बघून कर्मठ मंडळी दुखावली. आपल्या मुलांवर खेडगीकर धर्मविरोधी संस्कार करत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. खेडगीकरांनी थोडे वातावरण निवळू दिले आणि नंतर एकेदिवशी त्यांनी गावातील प्रतिष्ठित लोकांची बैठक बोलावली. त्या दिवशी त्यांनी आपण जातीपातींनी केलेले भेद मानत नाही आणि भेदांनी निर्माण केलेली सामाजिक व्यवहारातील बंधनेही आपणास मान्य नाहीत असे खुलेपणाने सांगितले. आपल्या विचारांशी प्रतारणा करून शाळा चालवणे जमणार नाही असेही त्यांनी सांगून टाकले. जातीपातीचे भेद आणि अस्पृश्यता यांचा त्याग करण्याची वेळ आली आहे असा सूचनावजा सल्लाही त्यांनी सर्वांना देऊन टाकला. त्यांच्या या स्पष्ट आणि योग्य भूमिकेमुळे कर्मठ लोकांचेही मनपरिवर्तन झाले. नंतर कोणीही सामूहिक पंगतीला विरोध केला नाही. Swami Ramanand Tirtha
स्वामीजींनी हिंदू समाजाची सामाजिक परिस्थिती बालपणापासून पाहिली होती. ज्ञानेश्वर माउलींप्रमाणे तेही संंन्याशाचे पोर होते. त्यांचे बालपणीचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर. वडिलांची आध्यात्मिक व चिंतनशील वृत्ती व्यंकटेशवर संस्कार करत होती. एके दिवशी नदी किनारी साधू बुवांकडे व्यंकटेशने आपल्याला संन्यास घ्यावयाची इच्छा असल्याचे सांगितले. त्यावर साधू महाराजांनी त्याला ‘तथास्तु’ असा आशीर्वाद दिला. अशा रितीने बालपणापासून अध्यात्म आणि राष्ट्रभक्तीने ते प्रेरित झाले होते. Swami Ramanand Tirtha
लोकमान्य टिळकांची प्रेरणा:
स्वामीजींनी स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेतले, त्यामागे लोकमान्यांची खूप मोठी प्रेरणा होती. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध लढा देत होता. त्या लढ्याच्या बातम्या बाल व्यंकटेशला भावी कार्यासाठी बळ देत होत्या. सोलापुरात लोकमान्य टिळक भाषणासाठी येणार म्हणून मुद्दाम त्या दिवशी शाळेत परीक्षा ठेवण्यात आली होती. त्या दिवशी बाल व्यंकटेश परीक्षा सोडून लोकमान्य टिळकांच्या भाषणाला हजर राहिला. लोकमान्यांचे ‘स्व’त्व जागृत करणारे शब्द बाल व्यंकटेशला प्रभावित करून गेले. मातृभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्याने मनोमन निश्चय केला. पण दुसऱ्या दिवशी मात्र परीक्षा चुकवून भाषणाला गेल्यामुळे चिडलेल्या मास्तरांकडून शिक्षा झाली. त्याचा व्यंकटेशवर काही परिणाम झाला नाही. कालांतराने ज्या लोकमान्यांच्या भाषणामुळे व्यंकटेशच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्वाला संचारली त्या लोकमान्यांच्या निधनाची बातमी व्यंकटेशचे काळीज चिरत गेली. त्याच्या मनात विचारांचे काहूर उठले. मी सामान्य मार्गाने क्रमण करू की भारतमातेच्या सेवेसाठी माझे जीवन अर्पण करू? गृहस्थाश्रम स्वीकारून पती व पिता बनू, की ब्रह्मचारी राहून माझी शक्ती देशकार्यासाठी वेचू? त्याच दिवशी मावळत्या सूर्यास अर्घ्य देऊन व्यंकटेश ने “या क्षणापासून माझे भावी आयुष्य मी पूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पीन. सर्वसंग परित्याग करून आजन्म ब्रह्मचारी राहीन.” अशी प्रतिज्ञा केली आणि आणि देशसेवेचे व्रत स्वीकारले. Swami Ramanand Tirtha


गांधीजींचे प्रथम दर्शन:
शालेय जीवनात त्यांनी मोठे यश संपादित केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मॅट्रिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमळनेर येथे मानव्य शाखेसाठी त्यांनी प्रवेश घेतला. व्यंकटेश अभ्यासात अत्यंत हुशार होता परंतु आर्थिक परिस्थितीने त्यास हतबल केेले. तथापि व्यंकटेश परिस्थितीला आनंदाने स्वीकारत गेला आणि अनेक सज्जन गृहस्थ मदतीसाठी येत गेले. नंतर पुण्यात वाड्मय विशारद या पदवी परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. याच दरम्यान 1924 मध्ये पुण्यात गांधीजींचे दर्शन घेण्याचा व्यंकटेशला योग आला आणि त्यांच्या वक्तृत्वाने तो भारावून गेला. Swami Ramanand Tirtha
संन्यास दिक्षा ग्रहण:
स्वामीजींच्या आयुष्यातील अजून एक महत्वाचा काळ म्हणजे त्यांनी संन्यास आश्रम स्वीकारला तो काळ. हिप्परग्यात असताना सेवक संघाचे काम चालत असे. अनंतराव कुलकर्णी त्याचे प्रमुख होते. सेवक संघात आल्यानंतर स्वामीजींवर रामतीर्थांच्या विचारांचा प्रभाव पडला. संघातील सदस्य एका झोपडीमध्ये रामतीर्थांच्या छायाचित्रासमोर साधना करीत आणि तल्लीन होऊन जात. खेडगीकरांनी सेवक संघात प्रवेश करायचे ठरवल्यावर त्यांना विचारण्यात आले- परमेश्वरासाठी तू सर्वस्वाचा त्याग करण्यास तयार आहेस का? भिक्षेवरती तू राहू शकशील का? त्यांनी तयारी दर्शवली आणि हा प्रवेश त्यांच्या संन्यासाश्रमाची नांदी ठरला. 14 जानेवारी 1932 रोजी नारायण स्वामींनी व्यंकटेश खेडगीकरांना दीक्षा दिली आणि आजपासून तू ‘स्वामी रामानंद तीर्थ’ म्हणून ओळखला जाशिल असे सांगितले. Swami Ramanand Tirtha
स्वामीजींची दूरदृष्टी:
संस्थानातील हिंदूंवर निजाम, रझाकार आणि इत्तेहादुलकडून होणारे अत्याचार पाहून स्वामीजी व्यथित होत. संस्थानाबाहेर पुढील काही वर्षात कधी ना कधी इंग्रज देश सोडून जातील अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे लवकरच संस्थानाच्या आणि येथील हिंदू समाजाच्या मुक्तीची द्वारेही खुली होतील असा त्यांच्या मनाने ठाव घेतलाच होता. हिंदू महासभा, आर्य समाज आपापल्या परीने हिंदूंसाठी लढा देत होते. राजकीय शक्तीने संस्थान मुक्त व्हावे यासाठी काँग्रेस प्रयत्नशील होती. परंतु संस्थानाबाहेरील व्यक्ती असो की संघटना त्यांना संस्थानात कोणतेही प्रकट व राजकीय कार्यक्रम घेण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे अनेक प्रयत्न सर्व स्तरातून होत होते. समाज शक्तीची मोट बांधून योग्य वेळ आल्याशिवाय काहीही साध्य होणार नाही हे स्वामीजींच्या दूरदृष्टीने हेरले होते. लखनौमध्ये मुक्कामी असताना नारायणस्वामींनी संस्थानातील हिंदूंच्या दु:स्थितीबद्दल त्यांना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले किमान दहा वर्ष तरी शिक्षणाकडेच लक्ष केंद्रित करावे लागेल, त्यानंतर या प्रश्नांकडे संघाला लक्ष देणं शक्य होईल. 1932-33 दरम्यानचा हा प्रसंग. बरोबर दहा वर्षानंतर 1942-43 दरम्यान संस्थानात मुक्ती संग्रामासाठी स्वामीजी सत्याग्रही झाले होते. यावरून स्वामीजींना असलेल्या दूरदृष्टीचा अंदाज येतो. Swami Ramanand Tirtha
तत्वनिष्ठ स्वामीजी:
हैदराबादच्या स्वातंत्र्य लढ्यातील स्वामीजींना अत्यंत महत्वाचे सहकारी लाभले ते म्हणजे गोविंदभाई श्रॉफ, आ. कृ. वाघमारे आणि दिगंबरराव बिंदू. गोविंदभाई श्रॉफ यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव पडला होता. परंतु आंधळ्या निष्ठेचा व पोथी प्रामाण्यवादी असलेला कम्युनिस्ट पक्ष त्यांना कधीच भावला नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमधील लोकांकडून स्वामीजींना खूप त्रास झाला परंतु गोविंदभाईंनी त्यांची साथ कधीही सोडली नाही. देशात काँग्रेसमधून कम्युनिस्ट विचारांच्या नेत्यांना काढून टाकण्यात येत होते, परंतु संस्थानात विशेषतः मराठवाड्यात असे होऊ नये या मताचे ते होते. मराठवाड्यात कम्युनिस्टांचा मुळातच प्रभाव कमी होता आणि गोविंदभाईंसारखे कम्युनिस्ट प्रभावित बहुतांश नेते स्वामीजींना एकनिष्ठ होते. त्यामुळे निजामविरुद्ध लढायचे तर सर्वांना सोबत घेऊन सर्व शक्तिनिशी लढायचे असे स्वामीजींचे मत होते. तसेही स्वामीजींनी आपले जीवन काही काँग्रेसला वाहिलेले नव्हते. काँग्रेस त्यांच्यासाठी केवळ माध्यम होते. ज्याद्वारे संस्थान मुक्त करून त्यांना भारतमातेची सेवा करायची होती. त्यामुळे त्यांचे विचार शेवटपर्यंत अलिप्त होते. म्हणूनच त्यांनी आपल्या तत्वांशी तडजोड आणि कुठलाही स्वार्थ न बाळगता शेवटी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे पसंत केले होते. Swami Ramanand Tirtha
पहिला सत्याग्रह आणि तुरुंगवास:
1936 पर्यंत स्वामीजींना राजकीय-सामाजिक वलय प्राप्त झाले होते. हिप्परग्याच्या शाळेत स्वामीजींच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळाला, तर महाराष्ट्र परिषदेचे चिटणीसपद त्यांनी भूषवल्यामुळे त्यांचा सामाजिक कामाचा व्याप वाढत गेला. 1938 नंतर स्टेट काँग्रेसच्या स्थापनेसाठी आरंभ झाला. 1938 मध्ये स्वामीजी प्रथम हैदराबादला आले. स्टेट काँग्रेसच्या स्थापनेसाठी केलेल्या सत्याग्रहात त्यांना कैद झाली आणि स्वामीजींना कैद केले म्हणून संपूर्ण संस्थानात जागोजागी काँग्रेस नेत्यांनी सत्याग्रह आंदोलन केले. स्वामीजींच्या पहिल्याच आंदोलनामुळे निजाम धास्तावला गेला. पहिलाच लढा अती टोकाचा होऊ नये म्हणून गांधीजींच्या सूचनेवरून स्वामीजींनी सत्याग्रह मागे घेतला आणि त्यांची एप्रिल 1939 मध्ये तुरुंगातून सुटका झाली. पण आता तुरुंग हेच आपले घर आणि संस्थान हीच युद्धभूमी हे स्वामीजींनी मनोमन मानले होते. Swami Ramanand Tirtha
गांधीजींसोबत भेट आणि वैयक्तिक सत्याग्रह:
1940 मध्ये परिस्थिती जास्त चिघळली. संस्थानात हिंदुंवर निजाम आणि रझाकारांचे अत्याचार अधिक वाढू लागले होते. हिंदूंची गावची गावं रझाकार जाळत सुटले होते. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते संस्थानाकडे दुर्लक्ष करत होते. स्टेट काँग्रेस गुप्तपणे काम करत असताना अंतर्गत जहाल आणि मवाळ असे गट पडले होते. संस्था, संघटना आणि चळवळी दडपून टाकण्याचा निजामाने सपाटा लावला होता. आता स्वस्थ बसून चालणार नव्हते. त्यामुळे पत्रव्यवहार न करता संस्थानातील भीषण परिस्थिती प्रत्यक्ष सांगण्यासाठी स्वामीजी स्वतः गांधीजींना भेटण्यासाठी सेवाग्रामला गेले. गांधीजींना यथोचित समाचार सांगून काँग्रेसने संस्थानाच्या मुक्तीसाठी अग्रक्रम द्यावा अशी विनंती त्यांनी केली. त्यावर गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह करण्याची आणि कार्यकर्त्यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी असा सल्ला दिला. स्वामीजींची ही भेट महत्वपूर्ण ठरली. त्यांनी काँग्रेसचे लक्ष संस्थानाच्या प्रश्नाकडे वेधले होते. हैदराबाद येताच स्वामीजींनी निजामाला पत्र लिहून पाठवले आणि स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवावी आणि जबाबदार राज्य पद्धती अमलात आणावी अशी उघड मागणी केली. निजामाच्या इस्लामिक राष्ट्राच्या स्वप्नाला पहिल्यांदा कोणीतरी उघडउघड आव्हान दिले होते. त्यामुळे व्हायचे तेच झाले. स्वामीजींना राजद्रोही ठरवून कारागृहात डांबण्यात आले. यावेळी तुरुंगात जाताना स्वामीजींनी आपल्यासोबत गीतेची प्रत घेतली होती. तुरुंगात स्वामीजींनी दोन महत्वाच्या गोष्टी केल्या. एक म्हणजे श्रीमद् भगवद्गीतेचे चिंतन आणि शत्रू भाषा उर्दूचा अभ्यास. Swami Ramanand Tirtha
निजामास परखड शब्दांत पत्र:
स्वामीजींचा हा तुरुंगवासही संपला. पुढे 1942 ला ‘चले जाव’ चळवळ देशभरात प्रारंभ झाली. या चळवळीत सहभागी होण्यासाठी स्वामीजींनी सहकाऱ्यांसोबत सत्याग्रह सुरू केला. त्यामुळे पुन्हा अटक होऊन त्यांना ‘चंचलगुंडा’ या तुरुंगात ठेवण्यात आले. संस्थानात सर्वत्र सत्याग्रह सुरू झाले यावेळी राष्ट्रीय नेत्यांचाही पाठिंबा मिळत होता. दंगली सुरू झाल्या. हिंदूंवरील प्रचंड अत्याचार सुरू झाले. स्वामीजींनी या दंगलींची सरकारी चौकशी व्हावी म्हणून दबाव निर्माण केला आणि स्वतः दंगलग्रस्त गावात जीव धोक्यात घालून गेले आणि पिडीत हिंदूंना आधार दिला. बिदर येथील दंगलीची चौकशी व्हावी म्हणून स्वतः गांधीजींनी ‘हरिजन’ मधून मागणी केली. अशा जातीय दंगली घडवून आम्हाला आमच्या ध्येयापासून कोणी परावृत्त करू शकत नाही हे ठणकावून सांगण्याची गरज होती. म्हणून स्वामीजींनी पुन्हा निजामाला पत्र पाठवले आणि हैदराबाद हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि भारताच्या स्वातंत्र्यातच हैदराबादचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे असे छातीठोकपणे सांगितले. स्वामीजींच्या या भूमिकेमुळे निजाम, धर्मांध जिहादी इत्तेहादुल मुसल्मिन आणि रझाकार अधिकच बेचैन झाले. त्यामुळे आंदोलन थोडे सौम्य होईल म्हणून स्टेट काँग्रेसच्या स्थापनेसाठी निजामाने परवानगी दिली आणि पाच वर्षाच्या संघर्षानंतर स्टेट काँग्रेसची जून 1947 मध्ये सिकंदराबाद येथे स्थापना झाली. Swami Ramanand Tirtha
पहिले अधिवेशन:
काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात स्वामीजींनी कार्यकर्त्यांना अध्यक्ष म्हणून मूलमंत्र दिला. “आंध्र, कानडी आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या व भारतीय वंशाचे ऐक्य स्पष्ट करणाऱ्या प्रदेशाचे एकत्रीकरण करून कृत्रिम सीमा असलेल्या हैदराबादचे अनैसर्गिक राज्य निर्माण करण्यात आले आहे. साम्राज्यवादी ब्रिटिशांच्या आधारावर तरणारे हे राज्य जास्त काळ टिकणार नाही. म्हणून ते भारतीय संघराज्यात समाविष्ट होणे हिताचे आहे. आपल्याला येथून पुढे कमालीची ऐक्यभावना आणि शिस्त पाळावी लागणार आहे. काही जणांचे बलिदानही होईल. हे कार्य हिमालयाइतके उत्तुंग आहे. आपल्याला राष्ट्रसेवेसाठी स्वतःला झोकून दिले पाहिजे. हैदराबाद मुक्ती हा राष्ट्राच्या निकडीचा प्रश्न आहे. आपले सर्व धैर्य एकवटून स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार करूया !” अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यात प्राण फुंकले. Swami Ramanand Tirtha
कृती समितीची निर्मिती:
अधिवेशनानंतर काँग्रेसची ध्येय धोरणे निश्चित झाल्यावर स्वामीजींनी कृती समितीची स्थापना केली. लढा सुरू होताच आपल्याला अटक होणार. हिंदू समाजावर आघात होणार, याची त्यांना जाणीव होती. त्यामुळे भूमिगत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लढा यशस्वी करण्यासाठी त्यांनी एक रणनीती आखली. गांधीजी सशस्त्र लढ्याला परवानगी देणार नाहीत हे त्यांना ठाऊकच होते. तथापि रझाकारांशी लढायचे तर निःशस्त्र लढून उपयोगाचे नव्हते. त्यामुळे सशस्त्र लढ्याचीही त्यांनी आखणी केली. दिल्लीत गांधीजींची भेट घेऊन स्वामीजींनी रझाकारी अत्याचाराची सविस्तर माहिती गांधीजीसमोर ठेवली आणि लोकांना शक्य होईल ते शस्त्र बाळगण्यास सांगितले. त्यावर गांधीजींनी प्रत्यक्ष समर्थन दिले. आत्म संरक्षणासाठी शस्त्राचा मर्यादित वापर करावा परंतु कोणत्याही जाती जमातीच्या व्यक्तीवर मुद्दामहून हल्ला करू नये असा सल्ला त्यांनी दिला. Swami Ramanand Tirtha
झेंडा सत्याग्रह:
1938 ते 1948 दरम्यान मुक्ती लढ्याचा संघर्ष उत्तरोत्तर तीव्र होत गेला. त्यात अनेकांनी बलिदान दिले. बँका लुटल्या जात होत्या, रझाकरांचा प्रतिकार होत होता, सत्याग्रह सुरू होते, विविध आंदोलने होत होती. अशातच भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस जवळ आला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्टेट काँग्रेस उठाव करील असा अंदाज निजामाने बांधला होता आणि तो त्या तयारीत होता. परंतु स्वामीजींच्या तल्लख बुद्धीने निजाम कुठपर्यंत विचार करू शकतो हे हेरले होते. त्यानुसार त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आठ दिवस आधीच सुलतान बाजारमध्ये काँग्रेसचा ध्वज फडकावून ‘हिंदी संघराज्य विलीनीकरण’ दिन साजरा केला. एवढेच काय तर 15 ऑगस्टच्या पहाटेच नेहरूंनी स्वतंत्र भारताचा दिलेला झेंडा फडकवून झेंडा सत्याग्रहास सुरुवात केली. याच दिवशी उस्मानिया विद्यापीठाच्या इमारतीवर तिरंगा ध्वज फडकावून 8 हजार विद्यार्थ्यांनी बंदी हुकूम मोडून खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन मिरवणूक काढली. Swami Ramanand Tirtha
जैसे थे करार:
भारत स्वतंत्र होताच निजामाचे स्वतंत्र हैदराबादसाठीच्या गतिविधी वाढल्या. त्यामुळे स्वामीजींनी दोन मार्गांनी लढा चालू ठेवायचे ठरवले होते. त्यातील पहिला मार्ग होता स्वतंत्र भारताच्या केंद्र सरकार व निजामासोबत वाटाघाटी करणे आणि ते अयशस्वी झाल्यास लष्करी कारवाई करून निजामी सत्ता संपुष्टात आणणे. पहिल्या मार्गाने राज्यव्यापी आंदोलन सुरू झाले होते. त्याच्या दबावामुळे निजाम वाटाघाटी करण्यास तयार झाला. परंतु केवळ वेळ मारून न्यायचे काम त्याच्याकडून सुरू होते. जबाबदार शासन पद्धती लागू करणे आणि संस्थानचे भारतात विलीनीकरण करणे अशा दोन किमान मागण्या स्टेट काँग्रेसच्या होत्या. निजामाकडून लायक अली स्वामीजींचे मन वळविण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. त्यांचा दोन महिन्याचा तुरुंगवास कमी केला. परंतु स्वामीजी आपल्या मागण्या बदलण्यावरून मागे हटलेच नाहीत. शेवटी याची परिणीती म्हणून ‘जैसे थे करार’ करण्यात आला. पण जैसे थे करार काही आपले उद्दिष्ट नाही असे स्वामीजींनी लगेच स्पष्ट केले आणि आमच्या दोन्ही प्रमुख मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले. Swami Ramanand Tirtha
लष्करी कारवाईसाठी आग्रह:
निजामाची पाकिस्तानच्या मोहम्मद अली जिनासोबत बोलणी सुरू होती. त्याचसोबत युनो व इंग्लंडसोबतही बोलणी सुरू होती. संस्थानातील जातीय दंगली आणि रझाकारांचा उन्माद कमी होत नव्हता. कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात येत होते. दररोज अनेकांचे बलिदान होत होते. कित्येक लोक नाहक बळी पडत होते. स्वामीजींना अटक करण्यात आली होती. अशा भीषण परिस्थितीत कार्यकर्त्यांचा धीर खचत होता. काँग्रेसच्या नेत्यांना निजाम फुस लावून फोडू पाहत होता. या सर्व गोष्टी स्वामीजी आणि सरदार पटेल यांना कळत होत्या. सरदार पटेल स्वतः लष्करी कारवाईसाठी प्रयत्नशील होते. स्वामीजी त्यांची पूर्ण सज्जता आणि योग्य वेळ येण्याची वाट पाहत होते. जैसे थे कराराचा कालावधी संपत आला होता. अशा परिस्थितीत आता लवकरात लवकर केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा म्हणून स्वामीजींनी सरदार पटेल यांच्याकडे आग्रह धरला आणि ‘ऍक्शन पोलो’ ची तयारी सुरू झाली.
पोलीस कारवाईसाठी मुहूर्त ठरला. 13 सप्टेंबर 1948 ते 17 सप्टेंबर 1947 या केवळ पाच दिवसांत पोलीस कारवाई पूर्ण झाली आणि निजामाने गुडघे टेकले. स्वामीजी या दरम्यान तुरुंगात होते. निजामाने भारत सरकारच्या सर्व मागण्या मान्य केल्या. स्वामीजींच्या सूचनेनुसार कृती समितीने आपली भूमिका निभावली. Swami Ramanand Tirtha
सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रवास:
हैदराबाद मुक्त झाल्यानंतर ताबडतोब स्वामीजींनी संस्थानात प्रवास व भेटी सुरू केल्या. संघटनेतील कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली. स्वातंत्र्य मिळाले आहे आता सुडाचे राजकारण नको, झाले गेले विसरून जा, अल्पसंख्याकांचे रक्षण करा. विजय मिळाला तो केवळ हिंदूंचा नाही आणि पराभव मुसलमानांचा नाही. हा लोकशाहीचा विजय आहे. अन्यायाचे युग संपले आहे. दलितांना आणि स्त्रियांना आता मुक्त श्वास घेता येईल. हिंदू समाजाचे सर्वात मोठे शत्रू असलेल्या अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता नष्ट करण्याचा त्यांनी निर्धार केला. जातीय सलोखा निर्माण करणे, मुस्लिम समाजात विद्रोह निर्माण न होऊ देता राष्ट्रीयता, बंधुता निर्माण होण्यासाठी विश्वासात घेणे आणि हरिजनांना मंदिर प्रवेश खुले करणे असे कार्य सुरू केले. पैठणचे नाथ मंदिर 12 नोव्हेंबर 1948 रोजी स्वतः स्वामीजींच्या उपस्थितीत हरिजनांसाठी खुले करण्यात आले.
स्वामींजींची बदनामी:
स्वामीजींच्या आयुष्याचे ध्येय साध्य झाले होते. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर त्यांनी केलेली भारतमातेच्या सेवेची प्रतिज्ञा सार्थ ठरवली. संस्थान विलीनीकरणानंतर राजकीय पद, सत्ता यासाठी त्यांनी प्रवास केले नाहीत. त्यांनी शक्य तितक्या लवकर सामाजिक स्थिरता व्हावी यासाठी प्रवास सुरू केले. ज्या सामाजिक दुर्गुणांमुळे भारत गुलाम झाला त्यांना मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या संघटनेची प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे होती तिला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तथापि संघटनेतील ज्या लोकांनी लढा सुरू असताना गंमत पाहिली त्यांनी संस्थान विलीन होताच स्वामीजींबद्दल दिल्लीतील सत्ताधाऱ्यांच्या मनात विष पेरण्यास सुरुवात केली. उमरी बँक लुटीतून मिळालेल्या धनाचा गैरवापर करत असल्यापासून ते तेलंगणातील कम्युनिस्ट आणि स्वामीजी यांच्यातील संबंधामुळे संघटना उभी राहत नाही असा अपप्रचार सुरू केला. स्वामीजी काही लोकांच्या राजकीय मार्गातील अडसर ठरत होते. तत्वनिष्ठ आणि केवळ गांधीजींना मानणारे असल्यामुळे केंद्रातूनही काही जणांना ते नको असावे. Swami Ramanand Tirtha
स्वामीजींना राजकीय स्वार्थ कधीच नव्हता. त्यांचे एकमेव उद्देश राष्ट्रसेवा हेच होते. त्याची पूर्ती त्यांनी राज्य पुनर्रचनेच्या माध्यमातून केली. महाराष्ट्राचा मराठवाडा, कानडी भाषिकांचा कर्नाटक आणि तेलगुंचा तेलंगणा अशा तीन भागात संस्थानाला विभागण्यात आले. सत्ता जाऊनही निजाम आणि प्रतिगामी शक्ती मिळून अनिष्ट प्रयत्न करीत होते. त्यामुळे तीन वेगळी राज्ये निर्माण करून स्वामीजींनी स्वतंत्र हैदराबाद नावाचे भूत कायमचे गाडून टाकले आणि काँग्रेसमधून कायमचा निरोप घेतला. भगवे वस्त्र नेसून, सन्यस्त होऊन आयुष्यभर नि:स्वार्थपणे राष्ट्रदेवतेची उपासना करणारे स्वामीजी एकमेव संन्यासी असावेत! Swami Ramanand Tirtha