गुहागर, ता. 19 : पोलिसांना कोणतेच सण, उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो. प्रत्येकवेळी कोणत्याही सण- उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते. त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र, गुहागर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात बुधवारी अकराव्या दिवशी रात्री ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. च्या जयघोषात गुहागर समुद्रकिनारी विसर्जन करीत गणेशोत्सवाचा आनंद घेतला. Bappa of Guhagar Police Station’s immersion
गुहागर पोलीस स्टेशन शेजारी महापुरुष मंदिरात सर्व पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव साजरा करत गणेशाची प्रतिष्ठापणा केली होती. दररोज पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या हस्ते आरती करण्यात आली. गेली अकरा दिवस पोलीस कर्मचाऱ्यांना सर्वत्र बंदोबस्त असल्याने पोलिसांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. गणेशोत्सवाचा आनंद त्यांना लुटता येत नसतो. अनंत चतुर्दशी गणरायाचे विसर्जन झाल्यानंतर गुहागर पोलिसांनी आपल्या बाप्पाचे अकराव्या दिवशी सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला. अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी ढोल ताशांच्या गजरात ठेका धरला होता. त्यांचे कुटुंबीय देखील या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. Bappa of Guhagar Police Station’s immersion
यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सावंत, उपनिरीक्षक संदीप भोपळे, सुजित सोनावणे यांसह सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी, महिला कर्मचारी सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक निघाल्याने मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रात्री उशिरा पोलीस स्थानक ते गुहागर चौपाटी अशी मिरवणूक काढून गणरायचे भक्तीभावाने विसर्जन करण्यात आले. यावेळी कोणत्याही उत्सवाचा आनंद आम्हाला घेता येत नसतो. मात्र आज गणेशोत्सवाचा आनंद साजरा करता आल्याचे समाधान मिळाल्याची भावना पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांनी व्यक्त केली. Bappa of Guhagar Police Station’s immersion