मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांची माहिती
गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यात जनतेच्या विकासाचे प्रश्न बरेच आहेत. ते येथील लोकप्रतिनिधींनी सोडविलेले नाहीत. हे प्रस्थापीत नेते करतात काय असा सवाल उपस्थित करुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार, आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढणार असून जिल्ह्यातील पाचही जागांवर मनसे लढविणार असल्याची माहिती मनसे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी दिली. MNS leader Abhyankar visit Guhagar
मनसे नेते व प्रवक्ते अभ्यंकर यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा सुरु असून येथील पाचही मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी त्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. शनिवारी ते गुहागर दौऱ्यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले कि, मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट बांधकामाविरोधात मनसेनेच सर्वप्रथम आवाज उठविला होता. येथील स्थानिक बेरोजगारांचे प्रश्न धूळखात पडले आहेत. कोणतेही उद्योग-व्यवसाय नाहीत. त्यामुळे येथील तरुणांचे मोठ्या शहरांकडे स्थलांतर होत आहे. रुग्णालये, शाळा यांची दयनीय अवस्था असून पर्यटन विकासही झालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. MNS leader Abhyankar visit Guhagar
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. मात्र, एवढा पैसा कुठून उभा करणार असा प्रश्न उपस्थित करुन केवळ मतांसाठीच या योजना अमलात आणल्या जात असल्याचा आरोप अभ्यंकर यांनी केला. कोकणचा कँलिफोर्निया करण्याच्या वल्गना आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी केल्या. मात्र, प्रत्यक्षात तो अमलात आणला नाही. त्यामुळे कोकण व राज्याच्या विकासासाठी राजसाहेब ठाकरे यांना एकदा संधी द्या, आम्ही या संधीतून विकास करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच जिल्ह्यात पाचही जागांवर मनसे आपला उमेदवार उभा करणार असून कोण उमेदवार द्यायचा हे राजसाहेबच ठरवतील असे सूचक वक्तव्य केले. MNS leader Abhyankar visit Guhagar
आम्ही प्रत्येक तालुक्यात जाऊन तेथील विकास कामांचा आढावा घेत आहोत. तेथील जनतेचे प्रश्न नेमके काय आहेत हे जाणून घेत आहोत. आमच्या कार्यकर्त्यांना येथील सत्ताधाऱ्यांकडून त्रास दिला जात आहे. मात्र, हे कार्यकर्ते आपल्या पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत असून त्यांना दिलेल्या त्रासाबद्दल मी राज ठाकरेंकडे हा मुद्दा मांडणार असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी कोकणचे नेते वैभव खेडेकर, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, गुहागर संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्यासह चिपळूण, गुहागरचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. MNS leader Abhyankar visit Guhagar