गुहागर, ता. 27 : जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल सप्ताह १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट दरम्यान, साजरा करण्यात येणार आहे. विभागाकडून देण्यात येणा-या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणा-या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. District Revenue Department’s Revenue Week
महसूल विभागाने जिल्हा स्तरीय महसूली कामे वेळच्यावेळी पूर्ण करुन त्यानुसार अभिलेख अद्ययावत करणे, वसुलीच्या नोटीस पाठविणे, मोजणी करणे, अपिल प्रकरणांची चौकशी करणे आदी कामे वेळच्यावेळी व वेळापत्रकानुसार करणा-या व महसूल वसुलीचे उदिष्ट पार करणा-या अधिकारी, कर्मचा-यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या महसूल सप्ताहामध्ये, प्रत्येक दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी विशेष मोहिम, कार्यक्रम, उपक्रम, शिबीरे, महसूल अदालत यांचे आयोजन करण्यात आले आहे. District Revenue Department’s Revenue Week


या सप्ताहात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताह, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” शुभारंभ, २ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”, ३ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” ४ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”, ५ ऑगस्ट रोजी “सैनिक हो तुमच्यासाठी”, ६ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा- दिव्यांगांच्या कल्याणाचा” उपक्रम, दि. ७ रोजी “महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकार/कर्मचारी उत्कृष्ट पुरस्कार वितरण” व महसूल सप्ताह सांगता समारंभ” साजरा करण्यात येणार आहे. District Revenue Department’s Revenue Week