5 वर्षांपूर्वीचा खेळ, 11 राज्यांतील 12 संघ, 300 खेळाडुंचा सहभाग
गुहागर, ता. 29 : गुहागर समुद्रकिनारी २ री राष्ट्रीय बीच टार्गेट बॉल अजिंक्य पद स्पर्धा भरविण्यात आली आहे. 28 ते 29 मे या कालावधीत गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रात घेण्यात येत आहे. या स्पर्धेत देशातील 11 राज्यातील 12 संघ खेळत असून एकूण 300 खेळाडुंचा सहभाग आहे. स्पर्धेचे उद्घाटन गुहागर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज बावधनकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेचे आयोजन बीच टार्गेट बॉल असोसिएशन ऑफ सांगली (महाराष्ट्र) यांनी केले आहे. Beach Target Ball Championship
बीच टार्गेट बॉल हा क्रीडा प्रकार नवीन असून भारतात चार ते पाच वर्षे हा खेळ सुरू आहे. या खेळाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा मागील वर्षी (2023) गोवा येथे झाली. समुद्रकिनारी वाळूत बास्केट बॉलप्रमाणे दोन संघात हा खेळ खेळला जातो. आपल्या संघाच्या खेळाडूंकडे बॉल पास करत तो छोट्या नेटमध्ये टाकून गोल करायचा असतो. वाळुत खेळताना दमछाक होते. त्यामुळे कमीत कमी धावून, आपल्या सहकाऱ्यांकडे बॉल पास करण्याचे कौशल्य या खेळात पणाला लागते. Beach Target Ball Championship
गुहागरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तमिळनाडु, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाणा, दिल्ली, राजस्थान, पंजाब व मुंबई (स्वतंत्र संघ) या राज्यांचे संघ सहभागी झाले आहेत. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, पदाधिकारी असे एकुण 300 जण या स्पर्धेसाठी गुहागरात आले आहेत. या स्पर्धेच्या उदघाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय बीच टार्गेट बॉल असोसिएशनचे सदस्य रवी सिंग, महाराष्ट्र राज्य सेक्रेटरी राजेंद्र कदम, तेलंगणाचे बाबू नाईक, आंध्रप्रदेशचे रेवनाथ डी, कर्नाटकचे श्रीधर यांच्यासह गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, गुहागर तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर मोरे, पत्रकार गणेश धनावडे, संकेत गोयथळे, सत्यवान घाडे, निलेश गोयथळे व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय स्पर्धेचे पंच म्हणून आर्यन पवार (उत्तर प्रदेश,) ख्रिस्तोपर (तामिळनाडू) मुरली (कर्नाटक) हे काम करत आहेत. Beach Target Ball Championship
या स्पर्धेचे आयोजन बीच टार्गेट बॉल असो. ऑफ सांगली, महाराष्ट्रचे विनोद नलावडे, अर्चना पाटील, राम हंबर्डे व सुरेश हादिमणी यांनी केले आहे. भविष्यात कोकणातील समुद्रकिनारी, देशातील प्रत्येक शाळेत हा खेळ खेळला जावा. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेत देशात या खेळासाठी वाळूची मैदाने तयार करण्याचे काम असोसिएनश तर्फे सुरू आहे. अशी माहिती माहिती विनोद नलावडे यांनी दिली. ऐन पर्यटन हंगामात बीच टार्गेट बॉल स्पर्धा समुद्रकिनारी सुरु असल्याने स्पर्धा पहाण्यासाठी गुहागरवासीयांबरोबरच पर्यटकांनी गर्दी केली होती. Beach Target Ball Championship