नावावर तब्बल १७ कामे, गुहागरात योजनेचे तीनतेरा, केवळ १ काम पूर्णत्वास
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेच्या एकूण ११२ पैकी १७ कामे एकाच ठेकेदाराकडे असून त्याच्याकडून केवळ १ काम पूर्णत्वास गेल्याची माहिती चौकशीअंती उपलब्ध झाली आहे. मुख्य म्हणजे ठेकेदाराने तीन उपठेकेदार नेमले असून यापैकी ’राजू’नामक उपठेकेदाराकडून कामांची दिरंगाई झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या योजनेचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. Jaljeevan Mission Plan
प्रत्येक घरामध्ये नळाद्वारे पाणी ही घोषणा शासनाने केलेली आहे. त्याची अंमलबजावणीही मोठ्या जोमाने होत आहे. अभियानास निश्चित कालावधी असतो आणि त्या कालावधीतच पूर्ण होणे अगत्याचे ठरते आणि ठरवलेले उद्दिष्ट गाठता येते. २०२४ पर्यंत ग्रामीण भागासाठी निर्धारित कालावधीत जलजीवन मिशन योजना पूर्णत्वास नेण्याचे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या योजनेचा निधीही मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक ठेकेदारांनी या योजनेचे कंत्राट मिळविण्यासाठी प्रयत्नही केले मात्र, काही गावांमधून ही योजना पूर्णत्वास नेण्यास अडथळे येत आहेत. Jaljeevan Mission Plan
गुहागर तालुक्यातील जलजीवन मिशनची एकूण ११२ पैकी १७ कामे ही एकाच ठेकेदाराच्या नावाने घेण्यात आलेली आहेत. यातील काही कामे कमी दराने तर काही जादा दराने घेतली गेल्याचे समोर आले आहे. यामध्ये पाटपन्हाळे येथील नवीन नळपाणी पुरवठा योजना, आंबेरे खुर्द, खामशेत, वाकी येथील सुधारणात्मक पुनः जोडणी, चिखली मांडवकरवाडी येथे सुधारणात्मक पुनः जोडणी, माटलवाडी सुधारात्मक पाणी योजना, कारुळ येथे सुधारणात्मक पाणी योजना, झोंबडी पाणी योजना, खरेकोंड, शिवणे, कोतळूक, पोमेंडी, कुडली बंदरवाडी, जामसूद, पेवे, साखरी खुर्द या गावांचा यामध्ये समावेश आहे. Jaljeevan Mission Plan