गुहागर, ता. 06 : गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत शाखेतील एटीएममध्ये ५०० रूपयांच्या तब्बल ८० नोटा बोगस सापडल्या आहेत. या प्रकरणी भरणा करणाऱ्या तालुक्यातील गिमवी येथील अतुल अनंत लांजेकर यांच्यावर गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Case registered in case of bogus note
बैंक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेला लागूनच बाहेर एटीएम सेवा आहे. ज्यामध्ये पैसे काढताही येतात व पैशाचा भरणाही करता येतो. दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान, एटीएममध्ये पैशाचा भरणा करताना मशीनमध्ये अतुल लांजेकर यांच्या खात्यावर भरणा केलेल्या ४० हजार रुपये किमतीच्या ५०० रुपये किमतीच्या एकूण ८० बनावट नोटा आढळून आल्या. या नोटा बनावट असल्याची लांजेकर यांना जाणीव असतानाही त्यांनी सदरच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून त्या नोटा बँकेच्या कँश डिपाँझीट मशीनमध्ये भरुन त्याचा वापर केल्याने फिर्यादी यांनी लांजेकर यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार ३३/२०२४ भा.दं.वि. कलम ४८९ (ब) ४८९ (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा तपास गुहागर पोलीस करत आहेत. Case registered in case of bogus note