अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान
गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हे सेंटर सुरु करण्यासाठी वेळणेश्र्वरचे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. पुढील सोमवारपर्यंत कोविड केअर सेंटर क्रियान्वित करण्याच्या हालचाली महसुल आणि आरोग्य विभागात गतिमान झाल्या आहेत.
Due to growth in Corona Patient, District Collector ordered to restart Covid Care Center at Velneshwar.
एप्रिल 2020 मध्ये वेळणेश्र्वर येथील विद्या प्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची जागा शासनाने ताब्यात घेतली होती. तीथे सुरु झालेले कोविड केअर सेंटर कायम विविध कारणांनी चर्चेत राहीले होते. तब्बल सात महिन्यांनी ऑक्टोबर 2020 मध्ये शासनाने ही इमारत पुन्हा संस्थेच्या ताब्यात दिली. पुन्हा एकदा 6 महिन्यांनी हीच इमारत कोविड केअर सेंटरसाठी ताब्यात घेण्याची वेळ शासनावर आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र गुहागरच्या तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. या पत्र घेवून कोविड केअर सेंटरसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेण्याची प्रक्रिया तहसीलदार कार्यालयातून सुरु झाली आहे. शुक्रवारी दुपारी तहसील कार्यालयातील अधिकारी तलाठ्यांना सोबत घेवून महाविद्यालय प्रशासनाला भेटले. त्याप्रमाणे तहसील कार्यालयातून आरोग्य विभागाला देखील पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे तालुका आरोग्य विभागातून कोविड केअर सेंटरमधील व्यवस्थांच्या उभारणीसाठी देखील हालचाली सुरु झाल्या आहेत.
गेल्यावर्षी कोविड केअर सेंटरमधील रुग्णांची चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था सुरुवातीला मार्गी लागली नव्हती. त्यानंतर हेदवीतील उदय जाधव यांच्याकडून रुग्णांना भोजन व चहा नाष्टा पुरवला जात होता. मात्र उदय जाधव यांच्या बिलापैकी सुमारे 3 लाख 27 हजार इतकी रक्कम शासनाने दिलेली नाही. कोविड केअर सेंटर संदर्भातील अनुदान न आल्याने दुसऱ्या टप्प्यातील अनेक बीले देणे बाकी आहे. अशी माहिती महसुलमधील अधिकाऱ्यांनीच दिली. त्यामुळे नव्याने कोविड सेंटर सुरु करताना आधीची बीले अदा करण्याची व्यवस्था स्थानिक प्रशासनाला करावी लागणार आहे. गेल्यावर्षी कोविड केअर सेंटर सुरु असताना अन्य व्यवस्था नीट मार्गी लागल्या नाहीत. परिणामी सेंटरचे व्यवस्थापन, कोविड रुग्णांचा व बायो मेडिकल कचरा, तेथील शिल्लक अन्नपदार्थांची विल्हेवाट न लागणे, पाणी व्यवस्था आदी अनेक मुद्द्यांवरुन वाद निर्माण झाले होते. या सर्व त्रुटी दुर करण्याचे आव्हान तालुका प्रशासनासमोर आहे.
संबंधित बातम्या वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा.