कोतळूक येथील महिला झिजवतेय उंबरठे; दुसऱ्याकडून उसनवार घेऊन घराचे बांधकाम केले पूर्ण
गुहागर, ता. 04 : तालुक्यातील कोतळूक गावातील निराधार महिला लक्ष्मी पांडुरंग गोरिवले या मोदी आवास घरकुल योजनेतून घर मंजूर झाल्याचे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. घरकुल मंजुरीनंतरचा पहिला हप्ता १५ हजार रुपये त्यांना देण्यात आला. त्यानंतर त्यांनी घराचे काम सुरू केले. जोत्याचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर दुसरा हप्ता ४५ हजार रूपये मिळतील या आशेने त्यांनी जोत्याचे बांधकाम पूर्ण केले. अनेकदा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक तसेच पंचायत समिती येथील अधिकाऱ्यांना भेटून दुसरा हप्ता मिळावा, अशी मागणी केली. मात्र, अद्याप त्यांना तो मिळालेला नाही. अखेर या निराधार महिलेने दुसरे राहते घर नसल्याने दुसऱ्या कडून उसने पैसे घेऊन घराचे बहुतांश काम पूर्ण केले आहे. दुसऱ्या हप्त्यासाठी गेला महिनाभर ग्रामपंचायत कार्यालय व पंचायत समितीचे कार्यालयाचे त्या उंबरठे झिजविताना दिसत आहेत. Modi Awas Yojana
ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी मोदी आवास योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूरही झाले. त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिला हफ्ता १५ हजार रूपये मिळाला. मात्र दुसऱ्या ह्फ्त्याची घरकुल धारकांना अजूनही प्रतीक्षाच असून ही योजना म्हणजे “लोकांना गाजर दाखवणे” अशी स्थिती दिसून येत आहे. यावर्षी सन २०२३/२४ या वर्षात गुहागर तालुक्यात ६१५ घरांणा मंजुरी देण्यात आली. त्यातील ६०६ घरांना पहिला हप्ता देण्यात आला आहे. त्यातील ९ घरे तांत्रिक कारणास्तव पहिला हप्ता देण्यात आला नाही. गुहागर तालुक्यात २८ अपंग तर ५८७ ओबीसींसाठी घरकुलांचे प्रस्ताव मंजूर आहेत. मार्च अखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता न मिळाल्याने सर्वच लाभार्थ्यांना घरघर लागली आहे. गुहागर पंचायत समितीकडून दुसऱ्या हप्त्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र पुढील सूचना येईपर्यंत हप्ता सोडू नये असा मेसेज वरिष्ठांकडून देण्यात आला, अशी माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी दिली. Modi Awas Yojana
मोदी आवास घरकुल मंजुरीनंतर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये फक्त १५ हजार रु. चा पहिला हफ्ता पडल्याने दुसरा हफ्ता येण्याची वाट लाभार्थी पाहत आहेत. मोदी आवास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात असंख्य लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अनेकांनी आपल्या घरांच्या उभारणीसाठी तयारीही केली. जागा निश्चिती, बांधकामासाठी ठेकेदार नियुक्ती यांसारख्या प्राथमिक गोष्टी पूर्ण केल्या. मात्र ४५ हजाराचा दुसरा हफ्ता मिळाल्याशिवाय कामाला गती मिळणार नाही. तरीदेखील पुढील पावसाळा लक्षात घेता अनेकांनी कर्जबाजारी होऊन घराचे बांधकाम पूर्ण केले आहे. काही महिलांनी वाडी व बचत गटातून कर्ज घेतले आहे. घेतलेल्या कर्जाचे हप्ते ते देऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. काही लोकांकडून उसने पैसे घेऊन घराचे काम पुर्ण केले आहे. Modi Awas Yojana
या योजनेतून होणाऱ्या घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एकूण १ लाख २० हजार मंजूर आहेत. यापैकी पहिला हप्ता १५ हजाराचा असतो. दुसरा हप्ता ४५ हजार रूपये जोत्याचे काम पूर्ण झाल्यावर तिसरा हप्ता लेवल पुर्ण झाल्यानंतर ४० हजार रूपये, चौथा हप्ता शौचलयासह घरकूल पुर्ण झाल्यानंतर २० हजार रुपये मिळतात. अनेक लाभार्थ्यांनी घराचे काम पूर्ण केले असून सुद्धा अजूनही त्यांना दुसरा हप्ता मिळाला नाही. ही शोकांतिका आहे. कोतळूक गावातील निराधार महिला मोदी आवास घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सतत ग्रामपंचायत व पंचायत समिती त्याचप्रमाणे गावातील प्रतिष्ठित लोक यांना भेटत असून दुसरा व तिसरा, चौथा हप्ता कधी मिळणार याची विचारना करत आहेत. Modi Awas Yojana