रत्नागिरी, ता. 03 : येथील कृष्णाजी चिंतामण प्राथमिक आगाशे विद्यामंदिरात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचे एक दिवसाचे निवासी शिबीर घेण्यात आले. यामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. Residential Camp at Agashe School
हरहुन्नरी कलाकार श्रीकांत ढालकर यांनी विद्यार्थ्यांना विविध कला दाखवून मनोरंजन केले. त्यानंतर कार्यानुभव तासिका सुधीर शिंदे यांनी घेतली. सायंकाळी शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी मांडवी समुद्रकिनारी भेट दिली. मौजमजा करून विद्यार्थी पुन्हा शाळेत पोहोचले. शाळेत हात-पाय धुऊन, सायंप्रार्थना केली. शुभंकरोति, रामरक्षा, मारुतीस्तोत्र व अथर्वशीर्षाचे पठण सर्वांनी केले. नंतर आकाशदर्शनाचा कार्यक्रम रंगला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील प्राध्यापक व खगोल मंडळाचे प्रमुख प्रा. बाबासाहेब सुतार यांनी दुर्बिणीद्वारे विद्यार्थ्यांना आकाश दर्शन घडवले. विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संपन्न झाले. रात्रीचे जेवण झाल्यानंतर डॉ. कस्तुरे यांनी जादूचे प्रयोग दाखवून मुलांचे निखळ मनोरंजन केले. शेवटी शेकोटीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. त्यानंतर विद्यार्थी शाळेत झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून विद्यार्थ्यांनी आपले सर्व आवरून झटपट तयारी करून मैदानात एकत्र जमले. तिथे स्वाती मलुष्टे, प्रेरणा नागवेकर, ईशा रायंगणकर यांनी मुलांना झुंबा डान्स व सांगितिक योगा शिकवला. त्यानंतर शिबिराची सांगता झाली. Residential Camp at Agashe School
निवासी शिबिराला डाएटचे प्राचार्य सुशील शिवलकर, सौ. गीताली शिवलकर, विषयतज्ज्ञ सौ. काणे, सौ. जंगम, डाएटच्या प्रा. दीपा सावंत, राजेंद्र लठ्ठे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा पाटील, विस्तार अधिकारी संदेश कडव, नगरपालिका प्रशासनाधिकारी सुनील पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या सर्व अधिकाऱ्यांनी या दिवशी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेचे प्रबंधक विनायक हातखंबकर, शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, माजी मुख्याध्यापिका शीतल काळे, शाळा समिती पदाधिकारी श्रीकृष्ण दळी, धनेश रायकर यांनीही भेट देऊन या नावीन्यपूर्ण उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले. मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांच्या नियोजनाखाली सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. Residential Camp at Agashe School