लाभार्थी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत, घरांची कामे होणार कधी?
गुहागर, ता. 29 : ग्रामीण भागातील गरीब व बेघर लोकांसाठी मोदी आवास योजना सुरु झाली. या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात अनेक लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूरही झाले. त्यानंतर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पहिला हफ्ता १५ हजार मिळाला. मात्र दुसऱ्या ह्फ्त्याची घरकुल धारकांना अजूनही प्रतीक्षाच असून ही योजना म्हणजे ‘’ना घर का ना घाट का’’ अशी स्थिती दिसून येत आहे. Modi Awas Yojana
राज्य शासनाने सन २०२३-२४ या वर्षांचा अर्थसंकल्प सादर करताना राज्यात इतर मागास वर्गासाठी ३ वर्षांत १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी ‘मोदी आवास घरकुल योजना’ सुरु करण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी येत्या तीन वर्षांत १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन ‘मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. Modi Awas Yojana
गुहागर तालुक्यात २८ अपंग तर ५८७ ओबीसींसाठी घरकुलांचे प्रस्ताव मंजूर आहेत. मार्चअखेर ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र मोदी आवास योजनेच्या लाभार्थ्यांना दुसरा हफ्ता न मिळाल्याने घरघर लागली आहे. गुहागर पंचायत समितीकडून दुसऱ्या हप्त्याच्या मागणीबाबत जिल्हा प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केला होता. मात्र, ही मागणी धुडकावण्यात आली आहे. Modi Awas Yojana
मात्र मंजुरीनंतर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये फक्त १५ हजार रु. चा पहिला हफ्ता पडल्याने पुढील हफ्ता कधी पडणार? असे लाभार्थ्यामधून बोलले जात आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात असंख्य लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. अनेकांनी आपल्या घरांच्या उभारणीसाठी तयारीही केली. जागा निश्चिती, बांधकामासाठी ठेकेदार नियुक्ती यांसारख्या प्राथमिक गोष्टी पूर्ण केल्या. मात्र ४५ हजाराचा दुसरा हफ्ता मिळाल्याशिवाय कामाला गती मिळणार नाही. या योजनेतून होणाऱ्या घरकुलासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एकूण १ लाख २० हजार मंजूर आहेत. यापैकी पहिला हप्ता १५ हजाराचा असतो. हा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाली की मगच घरकुलाच्या कामाला सुरुवात होते. त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी पहिल्या हफ्त्याचे काम करून दुसऱ्या ह्फ्त्याची प्रतीक्षा केली जात आहे. पुढील निधीच आला नसल्याने घरकुलांच्या बांधकामांना पुढील सुरुवात कशी करायची? असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे उभा आहे. Modi Awas Yojana