गुहागर, ता. 20 : तालुक्यात गेल्या 70 वर्षांचा विचार केला तर फार मोठी आंदोलने, संघर्ष झाले नाहीत. याला अपवाद होता दाभोळ वीज कंपनीविरोधातील तीव्र आंदोलनाचा. तसेच श्रीराम जन्मभुमी मुक्ती आंदोलन, स्व. रामभाऊ बेंडल यांच्या काळातील सामाजिक अस्मितेच्या विषयाचा. परंतू या सर्व संघर्षमय वातावरणात कधीही अश्लाघ्य शब्दांचा वापर आणि व्यक्तिगत टिकेला थारा नव्हता. गेल्या 15 वर्षात राजकारणातील बदलाने नौटंकी, व्यक्तीगत आरोप प्रत्यारोप, शिव्यांचा वापर या सगळ्या गोष्टीचा गुहागरच्या सांस्कृतिक वातावरणात शिरकाव झाला आहे. राजकारण्यांच्या या असांस्कृतिक तु तु मैं मैं ला आपणच निष्ठावंत असल्याचे ठसवून सांगण्याची किनार देखील गेल्या 5 वर्षातील राजकीय अस्थिरतेने दिली आहे. Political rants and lost cultures
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्हा राजकीय राडेबाजीच्या दृष्टीने तसा शांतच समजला जातो. त्यातही गुहागर तालुक्याचा विचार केला तर राजकीय राडेबाजी शुन्य, गुन्ह्याचे प्रमाण अत्यल्प. गोव्याप्रमाणे गुहागरलाही अनेकजण सुशेगात समजतात. याला सर्वांत मोठा अपवाद ठरला तो म्हणजे एन्राँन विरोधातील आंदोलन. 1993-95 या काळात एका वीज प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक भुमिपुत्र उभा राहीला. या विरोधाला पुढे विदेशी कंपनी, भ्रष्टाचार, करारातील त्रुटी असे अनेक विषय चिकटले. गावकऱ्यांचे आंदोलन राज्याचे आंदोलन बनले. अनेक संघटना या आंदोलनाला जोडल्या गेल्या. हे आंदोलन प्रदिर्घ काळ चालले. पोलीसांना आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. कंपनीच्या लोकांच्या संरक्षणार्थ सशस्त्र सैन्य तैनात करण्यात आले. परंतु या सर्व राडेबाजीतही समर्थक आणि विरोधकांनी अश्र्लाघ्य भाषा कधीच वापरली नव्हती. कोणावर व्यक्तीगत टिकाही झाली नव्हती की नकला करुन एखाद्याच्या प्रतिमेचे विद्रुपीकरणही झाले नव्हते. Political rants and lost cultures
या संघर्षाव्यतिरिक्त आणखी एक सामाजिक अस्मितेचा रंग गडद करणारे आंदोलन 80 च्या दशकात उभे राहीले. या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1980च्या निवडणुकीत स्व. रामभाऊ बेंडल आमदार झाले. जनसंघ आणि नंतर भाजपा बालेकिल्ला असलेला मतदारसंघ काँग्रेसच्या स्व. बेंडल यांनी जिंकला. परंतु या राजकीय बदलानंतरही स्व. तात्या नातू आणि भाजप कार्यकर्ते असोत किंवा स्व. बेंडल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय राडेबाजी झाली नव्हती. Political rants and lost cultures
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे यजमानपद गुहागरकडे आले. संमेलनाच्या पूर्व संध्येला विद्रोही साहित्यिकांच्या गटाने गुहागरमध्ये आंदोलन करण्याचे नियोजन केले होते. इथेतर फक्त वैचारिक राडेबाजी होणार होती. मात्र गुहागरातील तत्कालीन धुरिणांनी ही राडेबाजी देखील होऊ दिली नव्हती. हा इतिहास उगाळण्याचे कारण एवढेच की, गुहागरातील सभ्य, सुसंस्कृत वातावरणाला गेल्या काही वर्षात तडे जावू लागले आहेत. विरोधकांच्या प्रतिमेचे हनन करण्यासाठी नकला, मिमिक्रीचा वापर, व्यक्तीगत टिका याचा वापर इतक्या प्रमाणात वाढला की, आपण राजकीयदृष्या कोण होतो हेच येथील कार्यकर्ते विसरुन गेला आहे. सभ्यता, सुसंस्कृतपणाला असभ्य भाषा आणि असंस्कृत दिखाव्याचे लागलेले वळण येथील मतदारांनी देखील स्विकारले आहे की काय अशी आजची स्थिती आहे. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षातील राजकारणाने निष्ठेची व्याख्याच बदलली आहे. माध्यमासमोर, सभांमधुन आपल्या नेत्याचे अवाजवी कौतुक केले आणि विरोधकांवर आगापिछा सोडून बरसले की त्यांचे श्रम फळाला येतात. Political rants and lost cultures
मात्र या सगळ्या राजकीय राडेबाजीतून आपण समाजाला कोणत्या दिशेला घेवून जात आहोत हेच नेत्यांना कळेनासे झाले आहे की काय असे वाटु लागते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे गुहागरमध्ये झालेली सभा. या सभेतील भाषा चुकीची नव्हती. जशास तसे उत्तर दिले गेलेच पाहिजे. अशी प्रतिक्रिया अनेकांकडून उमटली. यामध्ये ही कोकणची, गुहागरची संस्कृती नाही हा आवाजच दबुन गेला आहे. Political rants and lost cultures
प्रतिक्रिया
भाषेला आक्रमकतेची धार हवी, विरोधकांच्या चुकांचे जोरदार खंडनही झाले पाहीजे. आरोप प्रत्यारोपांची राळही उठली पाहीजे. पण हे करताना अश्र्लाघ्य शब्दांचा वापर आणि व्यक्तीगत टिकेला थारा असु नये. ही सामान्य मतदार म्हणून माझी किमान अपेक्षा आहे. – अद्वैत जोशी