रत्नागिरी, ता. 08 : करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हा या संस्थेच्या सातवा वर्धापनदिन ५ जानेवारी रोजी झाडगाव येथील माधवराव मुळ्ये भवन येथे उत्साहात साजरा झाला. घर प्रसन्नतेने नटवू या विषयावर विद्याभारती अ. भा. शिक्षण संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिलीप बेतकेकर यांनी उत्तम मार्गदर्शन केले. Anniversary Celebration of Karsallagar Association
व्यासपीठावर ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे अध्यक्षस्थानी होते. करसल्लागार असोसिएशनचे अध्यक्ष सीए वरदराज पंडित, उपाध्यक्ष राजेश गांगण, कोषाध्यक्ष सीए अभिजित पटवर्धन प्रमुख उपस्थित होते. भारतमाता पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी सात वर्षांतील वाटचालीवर आधारित लघुपट दाखवण्यात आला. Anniversary Celebration of Karsallagar Association
या वेळी श्री. बेतकेकर यांनी सांगितले की, माणसाचे जीवन हे हिमनगाप्रमाणे आहे. वर दिसणारे टोक म्हणजे भौतिक गरजा. परंतु मानसिक, भावनिक, मेंदूचा विकास, आनंदी भावना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले जात आहे. आजच्या पाल्यांना पंचकोषाधारित शिक्षणाची गरज आहे. अन्नमय कोष, प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष या अनुषंगाने पाल्यांना शिक्षण दिले पाहिजे. प्रत्येक बालकांमध्ये आठ प्रकारची किमान बुद्धिमत्ता असते. शिक्षण म्हणजे त्यांच्या डोक्यात काही भरवायचे नाही तर ही बुद्धिमत्ता बाहेर काढायची आहे. अन्नमयकोश, प्राणमयकोश, मनोमयकोश याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे. मन हे शक्तीचे आधार आहे. आपल्या मनामध्ये २४ तासांमध्ये साठ हजार विचार येतात. परंतु त्यातील ९५ टक्के विचार शिळे व नकारात्मक असतात. ते सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करावा. Anniversary Celebration of Karsallagar Association
श्री. बेतकेकर म्हणाले की, अलिकडे मुलांचा आयक्यू वाढत आहे व ईक्यू खाली येऊ लागला आहे. कुटुंबाच्या दिसणाऱ्या गरजा भागवण्याकडे लक्ष दिलं जाते. परंतु मुलांचे, स्वतःचे व्यक्तीमत्व आनंदी, प्रसन्न होण्यासाठी लक्ष दिले जात नाही. भूतानमध्ये जीडीपी नव्हे तर हॅप्पी इंडेक्स मोजला जातो. त्या देशातली माणसं किती आनंदी, प्रसन्न आहेत याचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. माणूस आनंदी असेल तर आजारी पडत नाही. त्यामुळेच तेथे कमीत कमी डॉक्टर आहेत. आताच्या काळात मुलांना आई-वडिल प्रचंड सुरक्षित वातावरणात वाढवतात. मुलांची अति काळजी आणि अति संरक्षण यामुळे आजची मुले कचकड्याच्या बाहुल्या झाल्या आहेत. Anniversary Celebration of Karsallagar Association
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे यांनी उज्ज्वल भारतीय संस्कृतीच्या उत्तुंग गोष्टी थोडक्यात सांगितल्या. करसल्लागार असोसिएशनचे काम चांगल्या प्रकारे सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सीए वरदराज पंडित यांनी सांगितले की, सात वर्षाच्या कालावधीमध्ये संस्थेने सभासदांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी अनेक उपयुक्त कार्यक्रम घेतले. कोरोना काळात आणि चिपळूण पूरग्रस्त परिस्थितीमध्ये समाजोपयोगी कार्य केले. करसल्लागारांसमोर आता नवनवीन आव्हाने आहेत. त्याकरिता प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्याकरिताही प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. आजचा व्याख्यानाचा विषय मार्मिक आणि उपयुक्त किंबहुना अनिवार्य असून आपली कुटुंबव्यवस्था समृद्ध करण्यासंदर्भात आहे. Anniversary Celebration of Karsallagar Association
सीए वैभव देवधर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय अॅड. उज्ज्वल बापट यांनी करून दिला. चंद्रकांत हळबे यांच्या हस्ते बेतकेकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी करसल्लागार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्यांनी मेहनत घेतली. Anniversary Celebration of Karsallagar Association