पाटपन्हाळे ग्रामपंचायत; निविदा प्रक्रिया थांबविण्याची ठेकेदाराची मागणी
गुहागर, ता. 04 : गेल्या 4 वर्षात ग्रामपंचायतीचे एकही काम केलेले नसताना, निविदा कमी दराची असताना, निविदा उघडल्यानंतर माझे नाव काळ्या यादीत टाकल्याचे पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने सांगितले आहे. याबाबत पुराव्यासह खुलासा करावा अशी मागणी ठेकेदाराने ग्रामपंचायतीकडे केली आहे. तसेच खुलासा मिळेपर्यंत निविदा प्रक्रियेस स्थगिती द्यावी अशी विनंती सदर ठेकेदाराने सा. बां. विभाग व जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. Demand of contractor to stop tender process
ग्रामपंचायत पाटपन्हाळेने 17 जुलैला नागरी सुविधामधुन कोंडवाडी साईमंदिर ते खालची वाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे व कोंडवाडी गावडेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण या प्रत्येकी सुमारे 8 लाखाच्या कामाची निविदा प्रसिध्द केली होती. या कामांची निविदा मोहन चव्हाण या नोंदणीकृत ठेकेदाराने भरली. सदर कामांच्या निविदा फोडण्यात आल्या त्यावेळी मोहन चव्हाण यांचे दर अन्य ठेकेदारांपेक्षा कमी होते. तरीही सदरचे काम ग्रामपंचायत पाटपन्हाळेने अन्य ठेकेदाराला दिले. मोहन चव्हाण यांनी विचारणा केल्यावर तुमचे नाव काळ्या यादीत असल्याचे ग्रामपंचायतीने सांगितले. Demand of contractor to stop tender process
याविषयी बोलताना मोहन चव्हाण म्हणाले की, गेल्या 3 ते 4 वर्षात मी पाटपन्हाळे ग्रामपंचायतीचे एकही काम केलेले नाही. तरीही ग्रामपंचायतीने मला काळ्या यादी टाकल्याचे ऐकून धक्काच बसला. म्हणून कोणत्या ठरावानुसार माझे नाव काळ्या यादीत टाकले त्याच्या ठरावाची प्रत मागितली आहे. मात्र अद्याप ती मला मिळालेली नाही. हा माझ्यावर अन्याय आहे. कोणतेही ठोस कारण नसताना माझे नाव काळ्या यादीत टाकून ग्रामपंचायत माझे व्यावसायिक नुकसान करत आहे. याशिवाय सदर दोन्ही रस्त्यांची कामे मी शासनाच्या दरापेक्षा 21 टक्के कमी दराने दिली आहेत. त्यामुळे माझ्यापेक्षा वाढीव दर असलेल्या ठेकेदाराला काम देवून ग्रामपंचायत शासनाच्या निधीचे नुकसान करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेमागे अन्य काहीतरी दडले असल्याचा संशय येत आहे. म्हणूनच माझे नाव काळ्या यादीत का टाकले याचे पुराव्यासह उत्तर ग्रामपंचायतीने द्यावे. तोपर्यंत सदरची निविदा प्रक्रिया स्थगित करावी. अशी विनंती मी ग्रामपंचायतीसह, उपअभियंता बांधकाम उपविभाग गुहागर, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांचेकडे केली आहे. Demand of contractor to stop tender process