गुहागर, ता. 07 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी येथे तळ्यात पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६ वाजता घडली. Youth drowned in Sakhariaagar
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रज्ज्योत उदय मेहता असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. गुहागर तालुक्यातील कोंडकारूळ जागकरवाडी येथे राहणारा प्रज्योत हा २४ वर्षीय तरुण आपल्या चौघा मित्रांसोबत साखरी आगार कातळवाडी
येथील तळ्यावर सायंकाळी ४ वा.च्या दरम्यान पोहायला गेला होता. सुमारे दीड ते दोन तास सर्वांनी पोहण्याचा आनंद लुटला. त्यानंतर ते तळ्यातून बाहेर आले. थोड्या वेळाने त्यांना पुन्हा तळ्यात उतरण्याचा मोह झाला. या मोहानेच घात केला. एका बाजूला तिथे मित्र उभे असताना प्रज्ज्योत याने दुसऱ्या बाजूने तळ्यात सुर मारला. बराच वेळ तो पाण्यातून वर येत नसल्याने इतर तिघांनी उड्या मारून त्याचा शोध घेतला. त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले. पोटात गेलेले पाणी बाहेर काढूनही तो हालचाल करत नव्हता. अखेर एका खाजगी वाहनाने मित्रानी त्याला हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे येथील डॉ. चंद्रकांत कदम यांनी
सांगितले. Youth drowned in Sakhariaagar

पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी भा.दं. वि. कलम १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सचिन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल श्री. तडवी, किशोर साळवी या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. Youth drowned in Sakhariaagar
