गुहागर, ता. 23 : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात पूरबाधित म्हणून १६ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे नगर परिषदेने नियुक्त केलेली ९ पथके या भागावर विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. तसेच आपत्तीसाठी ६ बोटींसह अन्य यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 16 flood-affected places identified in Chiplun


शहरात जुलै २०२१ साली आलेला महापूर, दरवर्षी शहरातील काही भागात घुसणारे पुराचे पाणी, पावसाचे मोठे प्रमाण या सर्वांचा विचार करून यावर्षी नगर परिषदेने मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालय अधीक्षक अनंत मोरे यांच्या अनुभवातून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार आपली सज्जताही केली आहे. यावर्षीच्या या आराखड्यात बाजारपेठ, पेठमाप, गोवळकोट, गोवळकोट रोड, उक्ताड, चिंचनाका, वडनाका, मुरादपूर, शंकरवाडी, पवारआळी, वाणीआळी, पागमळा, भोगाळे, काविळतळी, खेड, मार्कंडी हे भाग पूरबाधित म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे या भागावर नियुक्त पथके विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत. 16 flood-affected places identified in Chiplun

