कोकणासह विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता
गुहागर, ता. 22 : बिपरजॉय चक्रिवादळामुळं तब्बल दोन आठवडे लांबलेला मान्सून अखेरीस महाराष्ट्रात दाखल झाला आहे. दक्षिण कोकणासह मुंबईत मोसमी वारे वाहत आहे. त्यामुळं आता राज्यातील शेतकरी आणि सामान्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. उद्यापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मोसमी वारे वाहणार आहे, परिणामी राज्यात मान्सून सक्रीय होणार आहे. त्यामुळं कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राची किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात २३ जून पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर २४ आणि २५ जून नंतर पावसाचा जोर वाढत जाणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे. Monsoon is active in Maharashtra

केरळानंतर ११ जून रोजी मान्सून कोकणात दाखल झाला होता. परंतु चक्रिवादळाच्या स्थितीमुळं मान्सून चांगलाच लांबला होता. परंतु आता वादळाची स्थिती ओसरल्यानंतर मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याचं आयएमडीकडून सांगण्यात आलं आहे. मराठवाड्यासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं आसमंताकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वाऱ्यांची स्थिती मंदावली आहे. परिणामी विदर्भात मान्सूनचे मोसमी वारे सक्रीय होणार आहे. त्यामुळं विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. Monsoon is active in Maharashtra

अरबी समुद्रात वाऱ्यांचा वेग थंडावला आहे. त्यामुळं कोकण, मुंबई आणि ठाण्यातही पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पावसाचा जोर कमी असेल त्यानंतर जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागलेला आहे. जून महिना संपत आलेला असला तरी अद्याप राज्यात मोसमी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच आता हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. Monsoon is active in Maharashtra
