चिपळूण तालुक्यातील ओमळीतील घटना
गुहागर, ता. 21 : चिपळूण तालुक्यातील ओमळी गोंधळेवाडी येथील ११ वर्षाचा मुलगा आणि २३ वर्षाच्या तरूणाचा खांदाट- पाली येथे वाशिष्ठी नदीच्या मारुती मंदिर जवळ असलेल्या डोहात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना सोमवारी (ता. 19) दुपारी घडली होती. मंगळवारी (ता. 20) दोघांचेही मृतदेह पाली डोहात आढळले. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. Youth with child drowned in river

याबाबत चिपळूण पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओमळी गोंधळेवाडी येथील विक्रम रविंद्र देवांग (२३) व हर्षल अनिल यादव (११) हे दोघे सोमवारी सकाळी मासेमारी करण्यासाठी पाली मारुती मंदिरजवळच्या वाशिष्ठी नदीच्या डोहात उतरले होते. त्यांची दुचाकी, मोबाईल व अन्य वस्तू पाली पुलावर होत्या. सकाळी घराबाहेर पडलेले दोघेही रात्रीपर्यंत घरी न आल्याने रात्री उशीरा चिपळूण पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली होती. त्यानुसार पोलीस त्यांचा शोध घेत असताना आज मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान हर्षल यादवचा मृतदेह आढळला. पाली ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. तर विक्रम देवांग याचाही काही वेळाने डोहात मृतदेह आढळला. पाचवीत शिकणाऱ्या हर्षलला पोहता येत नव्हते. कदाचित तो बुडताना त्याला वाचविताना विक्रमही बुडाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. Youth with child drowned in river

दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. याप्रकरणी शंकर यादव व लक्ष्मण रसाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सायंकाळी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी त्यांच्यावर ओमळी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही मुलांचा बुडून दुर्देवीरित्या मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. Youth with child drowned in river
