लक्ष्मीचौक ते शिरगाव हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी फेरीला प्रतिसाद
रत्नागिरी, ता. 22 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर आणि श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर विचार जागरण सप्ताहाला सुरवात झाली. लक्ष्मीचौक येथे जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी वीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी श्रीफळ वाढवून दुचाकी फेरीला प्रारंभ करून दिला. त्यानंतर भगवे ध्वज घेऊन शिरगाव हनुमान मंदिरापर्यंत दुचाकी फेरी काढण्यात आली. या फेरीत शंभरहून अधिक दुचाकीस्वार सहभागी झाले. भगव्या झेंड्यामुळे वातावरण भगवेमय झाले. वीर सावरकरांचा विजय असो, दानशूर भागोजीशठ कीर यांचा जयजयकार करत ही फेरी हनुमान मंदिरात पोहोचली. Start of Savarkar Vichar Jagran Week

श्री हनुमान मंदिरामध्ये हनुमंताला अभिवादन करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते हेमंत जोशी यांनी छोटेखानी व्याख्यान दिले. ते म्हणाले की, ब्रिटीशांनी सावरकरांना रत्नागिरीमध्ये राजकीय बंदी म्हणून आणले. पण त्या वेळी रत्नागिरीत प्लेगची साथ होती. म्हणून त्यांना शिरगावात दामले यांच्या निवासस्थानी ठेवले होते. या सहा-सात महिन्यांत सावरकरांनी हिंदूंची मोट बांधली. सावरकर सर्व शिरगाववासियांचे झाले. कै. विष्णुपंत दामले यांच्या निवासस्थानी सावरकर वास्तव्यास होते. त्यांच्याकडून मला सावरकरांच्या गोष्टी ऐकण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य समजतो. सावरकरांच्या विनंतीवरून हिंदु धर्मातील सर्व महिलांचे हळदीकुंकू झाले. बाबा शिरगावकर यांच्या घरी सत्यनारायण पुजेसाठीही सावरकर हे लहान मुलांना घेऊन गेले होते. मराठी शाळेत सवर्ण व अस्पृश्यांची मुलांना बसण्यास वेगळी व्यवस्था होती. परंतु सावरकरांच्या विनंतीनंतर सर्व मुले एकत्र बसू लागली. Start of Savarkar Vichar Jagran Week

शिरगावातील हनुमान मंदिर ऐतिहासिक आहे. सन १९२५ मध्ये महादेवबुवा उर्फ साधू लिंगायत यांनी शिरगावात हनुमान मंदिर उभारले. वीर सावरकरांनी सर्व हिंदू एकत्र येणार असले तरच मंदिराच्या उद्घाटनाला येतो, असे त्यांना कबूल केले आणि वीर सावरकरांनी रात्री जागून तुम्ही आम्ही सकल बंधू हिंदु हिंदु हे गीत रचले. उद्घाटनाच्या दिवशी हे गीत सुरेल आवाजात सर्वांनी म्हटले, सहा-सात महिन्यांत वीर सावरकरांनी सामाजिक समरसता कृतीतून दाखवून दिल्याचे हेमंत जोशी यांनी सांगितले. शिरगाव गायवाडी येथील कै. विष्णुपंत दामले यांच्या निवासस्थानीही सावरकरप्रेमींनी भेट देऊन अभिवादन केले. Start of Savarkar Vichar Jagran Week

या वेळी जागरण सप्ताहाचे समन्वयक रवींद्र भोवड यांनी वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती सांगितली. प्रवीण जोशी यांनी समरसता गीत सादर केले. श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टचे ट्रस्टी अॅड. विनय आंबुलकर यांनी यावेळी दुचाकी फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे सांगून सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करून आभार मानले. Start of Savarkar Vichar Jagran Week

