पाच जवान शहीद; सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन जारी
गुहागर, ता. 21 : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो हे भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याची बातमी समोर येताच काश्मिरमध्ये अतिरेक्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. पूंछ जिल्ह्यात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. त्यानंतर आता सुरक्षा दलाकडून पूंछ जिल्ह्यात अतिरेक्यांचा खात्मा करण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. ढगाळ वातावरणाचा फायदा घेत अतिरेक्यांनी जवानांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याची माहिती नॉर्दर्न कमांडने दिली आहे. Attack on army vehicle in Kashmir

लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३ वाजता राजौरी सेक्टरमधील भिंबर गली आणि पूंछ दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या लष्कराच्या वाहनावर अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवाद्यांनी ग्रेनेडचाही वापर केल्याने वाहनाला आग लागल्याचा अंदाज आहे. मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानतेचा फायदा घेत हा दहशतवादी हल्ला झाला. या भागात दहशतवादविरोधी कारवाईसाठी तैनात असलेल्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचे पाच जवान या हल्ल्यात शहीद झाले आहेत. तर आणखी एका जवान गंभीर जखमी असून त्याला तात्काळ राजौरी येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या या जवानावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची शोध मोहीम लष्कराने सुरू केली आहे. काश्मिरमधील या भ्याड हल्ल्याबाबत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. Attack on army vehicle in Kashmir
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो-झरदारी हे चार मे राजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. गोव्यात होणाऱ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या समिटमध्ये ते सहभागी होणार आहेत. त्यापूर्वीच काश्मिरमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातील काही अतिरेकी संघटनांचा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं आता काश्मिरमधील पूंछ हल्ल्यातील अतिरेक्यांचा सुरक्षा दलांकडून शोध घेण्यात येत असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. Attack on army vehicle in Kashmir
