• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 September 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आज जागतिक पान दिवस

by Manoj Bavdhankar
March 28, 2023
in Articals
149 1
0
आज जागतिक पान दिवस
292
SHARES
835
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मिलिंद पंडित, कल्याण
Guhagar News : पान खाणारा माणूस सोशिक असतो असं म्हणतात. चुका करणाऱ्या माणसा विषयी व्यसनी माणसाला जरा अधिकचा कळवळा असतो. खरंतर पानाने हॅबिट फॉर्मेशन होत नाही. पानात असं कुठलंही केमिकल नाही की ज्यामुळे सवय लागेल. पण नागवेलीच्या पानांचा जेव्हा विडा होतो तेव्हा त्याची चटक लागल्या शिवाय राहात नाही. त्यामुळे पान हा सवयीचा प्रकार मानला जातो. World Leaf Day

मुळात ते एक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. आपल्या मेंदूत विशिष्ट भाग असतो. सवय लागलेला प्रकार आपण खाल्ला की तिथून समाधानाचं केमिकल बाहेर पडतं. छान वाटतं. लेखकाच्या हातून एखादा सुंदर पॅरीग्राफ लिहून झाला की, त्याला एक दोन मिनिटं छान वाटतं. बाळाला दूध पाजल्यानंतर आईला जे समाधान मिळतं, आनंद मिळतो, ते फीलिंग ऑफ वेल बीइंग असतं. तो सुखद आस्वाद व्यसनातून वारंवार मिळतो. कारण तेच केमिकल वारंवार पाझरत राहातं. म्हणून आपल्याला व्यसन लागतं. मेंदूचा तो भाग तुम्हाला काहीतरी रिव्हर्ट करतो. मज्जातंतूंना त्याची सवय लागते आणि वारंवार छान छान वाटायला पाहिजे असं वाटतं राहातं. मग फ्रिक्वेन्सी वाढल्यामुळे सवय होते. चांगल्या गोष्टीची ती सवय आणि वाईट गोष्टीचं ते व्यसन. दोन्ही एकच. World Leaf Day

पण विडा किंवा पान खाणं हे फक्त व्यसन किंवा सवयीच्या भिंगातून नाही बघता येत. विडा हा आपल्या संस्कृतीचा जीवन शैलीचाच एक भाग. मराठी लग्नामध्ये विडे तोडण्याचा एक रोमॅण्टिक समारंभ असतो. तामिळ लग्नामध्ये तांबुल चर्वणम् हा विधी आहे. आधी तांबुल होतं. नंतर पान झालं. तांबुलात काय काय टाकायचं, त्याची घडी घालण्याची पद्धत कुठली त्यावरून कोणत्या विड्याला काय म्हणतात, याचे पूर्वापार वेगवेगळे प्रकार आहेत. World Leaf Day

देवस्थानात देवाला विडा देण्याचा प्रकारही आहे. आपण पान खातो तर आपल्या देवालाही तो देतो. देवाला पान देण्याचे हक्कही काही कुटुंबांना वाटून दिलेले आहेत. पूजा नैवेद्य झाल्यावर देवाच्या तोंडाला विडा लावला जातो. मग कुटलेलं पान प्रसाद म्हणून दिला जातो. आंबेजोगाईच्या मंदिरात ही प्रथा आहे. दक्षिणेत कर्पूरयुक्त पान देवाला अर्पण केलं जातं. तांबुलाची पद्धत मोहंजोदडो पासून आहे. मुघलकालीन जेवढी पेण्टिंग आहे त्यात पान देणं, पान खाणं आहेच. World Leaf Day

एकेकाळी पान खाणं कुणालाही चुकीचं वाटत नव्हतं. पुरुष आणि स्त्रिया दोघेही पान खात असत. घरातले पुरुष जेवण झालं की, ते पान खात ओसरीत बसायचे. तो पर्यंत बायका जेवून घेत. बायकांचं जेवण झालं की, मग एखाद्या लहान मुलाला पाठवून पानाचं तबक आत पाठवलं जायचं. World Leaf Day

वऱ्हाडात तर एकवेळ कुणी जेवण विचारलं नाही तरी काही वाटायचं नाही, पण घरात आल्यावर पानदान समोर ठेवलं नाही तर तो सगळ्यात मोठा अपमान समजला जायचा. त्यामुळे विडा किंवा तांबुल हा मानाचा भाग होता आणि आहे. म्हणूनच विडा उचलणं वगैरे वाकप्रचार रूढ झाले असावेत. विडा उचलण्या ऐवजी आता ‘सुपाऱ्या’ घेतात. World Leaf Day

आयुर्वेदातही तांबुल होताच. त्याचं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व अधोरेखित केलेलं होतं. प्रत्येक प्रकारचा रस आपल्या अन्नात असायला हवा असं आयुर्वेद सांगतं. आपल्या आहारात सगळं आहे, फक्त तुरट रस जेवणात येत नाही. ज्याला कषाय रस म्हणतात तो जवळपास नाहीच. मग हा तुरटपणा कुठून आणायचा, तर पानातून. तसा तो आवळ्याच्या सुपारीतून पण येतो. पण जेवणानंतर पान खाल्ल्यावर छान वाटतं. मुखशुद्धी होते. ओरल कॅव्हिटी स्वच्छ राहते. श्वासाला दुर्गंधी येत नाही. World Leaf Day

एवढंच नाही तर जखम भरून आणण्याची क्षमताही पानात आहे. जखमेवर पान बांधलं जातं. नवजात बाळाची बेंबी वर येऊ नये म्हणून नाळ कापलेल्या ठिकाणी जो पोटपट्टा बांधतात त्यातही नागवेलीचं पान बांधलं जातं. पान थोडं अ‍ॅसिडिक असतं. पण इतकं नाही की त्याचा त्रास होईल. कच्च पान खाल्लं की बेंबीच्या आसपास थोडं जळजळतं. त्यामुळे भूक लागते. पानात मेन्थॉलही असतं, त्यामुळे खरं तर वेगळी ठंडक घालण्याची आवश्यकता नसते. World Leaf Day

पान कामोत्तेजक म्हणूनही वापरलं जातं. पानात अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक असतात. म्हणूनच पलंगतोड पान वगैरे प्रकार विकसित झाले असावेत. पानात आणखी काही अ‍ॅफ्रोडिझिअ‍ॅक घटक टाकून त्याचं कामोत्तेजक स्वरूप आणखी वाढवताही येतं. शिवाय त्याच्याशी थोडा रोमान्सही जोडला गेला, त्यामुळे पानाला चांदीचा सोन्याचा वर्ख आला. पानाच्या अनुषंगाने अनेक प्रेमकथा, गूढकथा आणि चावटिका निर्माण झाल्या. वाजिद अली शाहच्या पान खाण्या संदर्भात अनेक दंतकथा आहेत. त्याच्या अनेक बेगमा होत्या. त्यामुळे त्याच्या पानात असे कामोत्तेजक घटक घातल्याचे दाखले सांगितले जातात. अशीही एक कथा आहे की, त्याने खाऊन टाकलेला चोथा त्याच्या भंग्याने खाल्ला आणि त्याचा असा काही परिणाम झाला की शेवटी त्या भंग्याच्या बायकोला वैद्याकडे न्यावं लागलं. World Leaf Day

मेहंदी प्रमाणेच पानाच्या बाबतीतही काही समज आहेत. नवऱ्याचं प्रेम खरं असेल नवऱ्याने भरवलेला विडा रंगतो, असंही म्हटलं जातं. पानासोबत रोमान्स आला आणि मग प्रेमाची पानं वेगळी झाली. मिठा पान विकसित झालं. त्यात गुलकंद आला. काही लोकांनी चुन्याला देखील नटवण्याचा प्रयत्न केला. पानात गुलाबाचा आणि केवड्याचाही सुगंधी एसेन्स आला. World Leaf Day

‘देवदास’ कादंबरीतली देवदास-पारोची पहिली भेट होते. तेव्हा देवदास पान खात असतो आणि हुक्का ओढत असतो, तेही शाळेला दांडी मारून. ‘शतरंज के खिलाडी’ मध्ये दोघे बुद्धिबळाचा पट घेऊन बाहेर खेळायला जातात तेव्हा दिवसभराची पानं बांधून घेतात, असाही उल्लेख आहे. जुनेच नाही तर नवे उल्लेखही विड्याचं कौतुक करणारे आहेत. World Leaf Day

संगीतकार एस.डी. बर्मन एकदा फुटबॉलची मॅच बघायला जात होते. एक प्रोड्यूसर गाणं मागण्यासाठी आला होता, त्यांनी त्यालाही गाडीत बसवलं. बर्मनदांनी सवयीने गाडीत बसून पान लावायला घेतलं. पण त्या प्रोड्यूसरची प्रश्नांची सरबत्ती काही कमी होईना. शेवटी कंटाळून बर्मनदांनी त्याला गाडीतून उतरवलं. कुणीतरी विचारलं, “दादा तो तर पैसे घेऊन आला होता. त्याला कशाला उतरवलं?” त्यावर ते म्हणाले, “जो मला पानही नीट खाऊ देत नाही, तो मला काम काय करू देणार?” World Leaf Day

मुस्लिम राज्यकर्त्यांच्या काळात अनेक संस्थानिकांमुळे पानसंस्कृती आणि अय्याशी यांचं नातं निर्माण झालं. जिथे आरामशीर, जमीनदारीचं आयुष्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला पानाचं प्रस्थ जास्त दिसेल. बनारस मध्ये दिसेल, कलकत्त्यात दिसेल. कलकत्त्या इतकं पान कुठेच खाल्लं जात नाही. मुंबईत अय्याशी दिसत नाही. कारण मुंबई हे वर्किंग कम्युनिटीचा प्रकार आहे. तरीही मुंबईत पानाचा मोठा बाजार नळबाजारात असायचा. पहाटे चार वाजता हे पानांचं मार्केट सुरू व्हायचं. आता पानाचं मार्केट चुनाभट्टीला आलंय. मोठा  गुंडाळा असतो, त्यात पाच हजारा पर्यंत पानं असतात. पानाचं शेल्फ लाइफ कमी असतं. त्यामुळे पानवाला कधीही पान वाया घालवत नाही. थोडं लागलेलं पान असेल तर तो कातरीने तेवढा भाग कापून टाकतो. World Leaf Day

मुंबईत पान आलं ते बाले लोका बरोबर. त्याबरोबर पानाची गादी हा प्रकार आला. कोकणातील वैश्य-वाण्यांची पान-तंबाखू, विडीची दुकानं थाटली गेली. त्यांच्याकडे पान खाणारे लोक वेगळे, भैय्याकडे पान खाणारे वेगळे. पान खाण्यामध्ये थोडी रंगबाजी आली. पान घ्या, ते नखला; अंगठ्याच्या नखाने पातळ शीर आणि पापुद्रा निघाला पाहिजे. पानाच्या जाती प्रमाणे शीर कमी जास्त असते. पूना पान पातळ. पानाच्या गादीवर मिळतं. पूना पानात चोथा भरपूर असतो. पानात जेवढा चोथा कमी तेवढी पानाची प्रत चांगली. पानात जेवढा तिखटपणा अधिक त्याप्रमाणे पानाची प्रत ठरते. World Leaf Day

काही जणांना पिवळं जर्द पान लागतं. काहींना हिरवंगार पान लागतं. कलकत्ता पान तिखट आहे. त्याला बांगला पान असंही म्हणतात. पूना पानात तो तिखटपणा नाही. पण पानाला चव आहे. बांगला पान मोठं, तिखट आणि चोथा कमी असतो. मघई हे जोडीने खायचं पान. एका वेळी दोन पानं खावी लागतात. त्यात एकही शीर नसते. तोंडात विरघळून जातं. पण शेल्फ लाइफ कमी. पानाची उपज कमी. भरघोस येत नाहीत. त्यामुळे ते महाग असतं. World Leaf Day

पान खाण्याच्या संस्कृती बरोबर पान लावण्याचे प्रकारही विकसित झाले आणि त्यासोबतचे शिष्टाचारही. आपल्याकडे पानाच्या चटण्या बोटाने फिरवतात. उत्तरेत ते अशिष्ट समजतात. तिथे दांडीने किंवा पानाला पान लावून चुना, काथ आणि चटण्या एकत्रित केल्या जातात. पानाच्या या शिष्टतेच्या संस्कृतीसह रसिकताही येऊन चिकटली. त्यामुळे साहित्यात त्याचे रंग उमटले नसते तरच नवल. World Leaf Day

ना.धों. महानोरांच्या, ‘भलताच रंगला काथ लाल ओठांत’ या कवितेतला ठसका बघा.. त्या दिसी करुन दिला विडा, टिचला माझा चुडा, कहर भलताच. तसंच कवी शैलेंद्रच्या गाजलेल्या ‘पान खाये सैंयाँ हमारो’ मध्ये ‘ले आया जालीम बनारस का जर्दा’ ला मिळणारा शिट्टय़ांचा प्रतिसाद विलक्षण असतो. राजा बढेंची ‘कळीदार कपुरी पान, कोवळं छान’ ही लावणी असू द्या किंवा माजघरात म्हटलेले पाळणे, ओव्या, गीतं असू द्या त्यात विड्याचे उल्लेख अपरिहार्य असायचे. World Leaf Day

सुपारी

पानाची सवय लागते ती सुपारीमुळे. कारण सुपारी मध्ये अल्कलॉइड्स असतात. हीच अल्कलॉइड्स अफू मध्येही असतात. फक्त श्रेणी मध्ये फरक असतो. सुपारीतलं अल्कलॉइडस् हे शेवटच्या दर्जाचं असतं. त्यामुळे त्याची नशा होत नाही. पण सवय जरूर लागते. ही अल्कलॉइड्स जेव्हा सुपारी कच्ची असते तेव्हा जास्त असतात. सुपारी वाळत जाते तसे ते सुपारीच्या आतला पांढरा गाभा आहे त्यात जमा होत जातात. या गाभ्या प्रमाणे सुपारीची प्रत बदलते. श्रीवर्धनची सुपारी म्हणजे दिवेआगर, आंबेत, हरिहरेश्वर या पट्टय़ातली सुपारी. ती बाजारभावापेक्षा २०० रुपये अधिक प्रीमिअम खाऊन जाते. त्याचं कारण पांढरा गाभा जेवढा जास्त तेवढी सुपारीला चव जास्त. एरव्ही सुपारीला चव काडीची नाही. सुपारी ही अ‍ॅक्वायर्ड टेस्ट आहे. नैसर्गिकरीत्या ती कुणालाही आवडणार नाही. दोन तीनदा खाल्ल्यानंतर तिची चव विकसित होत जाते. जशी वाइनची चव विकसित व्हावी लागते. सुपारी जेवढी कच्ची तेवढे तुमचे कान लाल होतात. सुपारीचा ठोठरा बसणे हा अनुभव घ्यायचा असेल तर कच्ची सुपारी खावी. आख्खं खानदान आठवतं. गुजरात मध्ये तिला काची सुपारी म्हणतात. नेपाळीत काचो सुपारी म्हणतात. उफाड्याच्या दिल घायाळ करणाऱ्या तरुण मुलीलाही काचो सुपारी अशीच उपमा आहे. तिथल्या लोकसाहित्यात ही प्रतिमा येते. World Leaf Day

सुपारी किनारपट्टीवर केरळ पासून आढळते. लाल तांबडी माती सुपारीला धार्जिणी. मातीनुसार सुपारीची चव बदलते. सुपारीचं उत्पादन मँगलोर मध्ये जास्त होतं. आपल्याकडच्या सुपारीला श्रीवर्धनचा रोठा म्हणतात. यात मग खूप बारीक बारीक प्रकार येतात. मद्रासची चिकणी सुपारीही लोकप्रिय आहे. पण ती काथाच्या पाण्यात प्रोसेस केलेली असते. त्यामानाने तिचा कमी ठोठरा बसतो. सुपारी श्रीलंका, बांगलादेश, कलकत्ता या भागातही होते. World Leaf Day

सुपारीत काहीतरी अद्भुत गुण आहेत अशी पहिल्या पासून धारणा आहे. तिच्यात काही मिस्टिक गुणधर्म आहेत. लग्नापासून ते मर्तिकापर्यंत जेवढे समारभं आहेत त्या प्रत्येकात सुपारी आहे. बिहारी लग्नात पहिल्यांदा जी परात येते त्यात परात भरून सुपाऱ्या असतात. मग सुपारीत नाना तऱ्हेचे ढंग सुरू झाले. उत्तर प्रदेशात वेगळे आणि दक्षिण भारतात वेगळे. दक्षिणेत सुपारीला कापराचा फ्लेवर मिळाला. त्यांच्या पानात कापूर घालतात. आपल्याला बुंदीच्या लाडवाला कापराचा वास आलेला चालणार नाही. पण तिथे बुंदीच्या लाडवाला कापराचा वास नसेल तर ते अशिष्ट मानलं जातं. World Leaf Day

सुपारीला ठोठरा बसतो, काथाचा कडवटपणा, चुन्याने जीभ भाजू शकते. यावर उतारा काय तर मग खोबऱ्याचा शिरकाव झाला, त्याने उग्रपणा थोडा कमी होतो. चवीला लवंग आले. (हे सगळे किनारपट्टीवरचे) नागवेल, सुपारीचं खांड, लवंगा, वेलदोडे, खोबरं. उत्तरेत केशर आलं. दक्षिणेत कापूर, क्वचित कस्तुरीचा उल्लेख आहे. पण ती कवीकल्पना असावी. World Leaf Day

धार्मिक कार्यक्रमाला प्रथम यजमान पुरोहिताला एक सुपारी देतो. ही कशासाठी तर तुम्ही आमचे काम चालवा. आज वेगळ्या कारणासाठी सुपारी दिली जाते. काम झाल्यानंतर आशीर्वचनासह ती सुपारी यजमानाला परत दिली जाते. या प्रत्येक टप्प्याला आपण नाव दिलेलं आहे. लग्नातही पान सुपारीच देण्याची पद्धत आहे. World Leaf Day

काथ

आपल्याकडे खैराचं झाड तोडण्यावर बंदी आल्यानंतर काथ मिळवणं कठीण झालं. काथ महाग होऊ लागला आणि पानात परवडेनासा झाला. आता मलेशियातल्या जंगलातल्या गंबीर झाडाचा काथ आपल्याकडे येतो. तो फार चांगला नसतो. World Leaf Day

तंबाखू

तांबुल भ्रष्ट केला तो तंबाखूने. तंबाखूने व्यसन पूर्णत्वाला नेलं. तंबाखू आल्यामुळे पानाचं नैतिक स्खलन झालं. सात्विक गृहिणीनं पटकन डोळा मारल्यावर जसं वाटेल तसं झालं. पोर्तुगीजांनी तंबाखू आणला. तंबाखूही मृत करून पानात वापरला जातो. त्याशिवाय त्याला नशा येत नाही. तंबाखूची हिरवी पानं गठ्ठे बांधून जमिनीत पुरून ठेवली जातात. त्यातलं क्लोरोफिल संपूर्ण संपल्यानंतर ती पिवळी पडल्या नंतर मग ती नशा येते. आजही गादीवर संपूर्ण तंबाखूचं वाळलेलं पान घेणारे शौकिन आहेत. World Leaf Day

खाण्याचा तंबाखू चवीला कडवट असतो. सुपारी आणि पान मिळून मग त्याचा कडवटपणा मरतो. वेगवेगळ्या काळात वेगवेगळे सुवास आले. पहिला केशर आला, काहींनी केवडा वापरला. सुगंधी तंबाखूला जर्दा म्हणतात. तीन गोष्टींसाठी भोपाळ प्रसिद्ध आहे. जर्दा, गर्दा आणि नामर्दा. सुगंधी तंबाखूची नशा आणि अतिसेवन अखेरीस वंध्यत्व आणते, असा अर्थ त्यातून ध्वनित होतो. तंबाखूचे १२०, १६०, ३०० हे मुळात प्रकार नसून हे तेव्हाचे किलोचे भाव आहे. डीएस नावाची एक कंपनी परफ्यूम्ड तंबाखू बनवायची. त्यांचे दर हेच पुढे त्या तंबाखूच्या प्रकारांचे नाव झाले. या पानात टाकून खायच्या सुगंधी तंबाखूने क्रांती केली. जर्दा कुणी वेगळा खात नाही. हा पानात खायचा तंबाखू. यात भोलानाथ केसरवानी यांचं नाव फार फेमस आहे. पानाच्या ठेल्यावर भोला तंबाखू टाक, असं म्हटल्यावर तो एक हिरवा डबा काढतो. त्यावर एक मुच्छड माणूस दिसतो. हाच तो भोलानाथ केसरवानी. या भोलानाथने हा पहिला तंबाखू अजरामर केला. भोला, मग १२०, मग १६० लोकप्रिय होत गेले. तंबाखूचं सुगंधी मिश्रण तयार झालं. World Leaf Day

किवाम

कजरारे गाण्यात एक ओळ आहे, ‘तेरे बातों में किवाम की खुशबू हैं’. किवाम म्हणजे तंबाखूचा चुरा वाया न घालवता त्याचं कूट करून जे मिश्रण केलं जातं ते किवाम. त्यातही नवरतन किवाम सगळ्यात फेमस. त्यानंतर राजरतन आला. यातला तंबाखू बरोबर जाणारा परफ्यूम महत्त्वाचा. दुसरा कोणताही सुगंध त्याबरोबर जात नाही. चार्ली वापरून तर कुणी खाणार नाही. या परफ्यूम शोधून काढणाऱ्यांनी कोट्यवधी रुपये कमावले. World Leaf Day

पुलंनी लिहिल्या प्रमाणे खरा गाणारा फक्त पखवाज, तंबोरा आणि गळा यावर स्वर्ग उभा करतो. तसा बेसिक खाणारा पान, चुना, काथ, खातो. सुपारी वेगळी कातरून तोंडात टाकतो. मग तंबाखू खातो. मग पाच मिनिटांनी पिंक टाकतो. पान अ‍ॅसिडिक, चुना अल्कलाइन, काथ म्युच्युअल, सुपारीत अल्कलॉइड्स. तरीही हे बेसिक चार घटक म्हणजे तंबोऱ्याच्या तारा सारखे मानले जातात. चांगल्या लावलेल्या तंबोऱ्यातून शुद्ध गंधार उमटतो. या चार घटकांचा एकत्र स्वाद गंधारा सारखाच असतो. तो एक प्रकारचं सुखद फीलिंग देतो. World Leaf Day तरीही वाटतं की या तांबुल फॅमिलीत सगळं मारूनच तयार होतं. चुना भाजला की तयार होतो. काथ जिवंत झाड कापून त्याच्या गाभ्यातला रस काढून तयार होतो. काथाची भट्टी लावावी लागते. सुपारी सुकवावी लागते, तर तंबाखू जमिनीत गाडून ठेवावा लागतो. कुणाला तरी मारून, जाळून मग हे पदार्थ तयार होतात. पान सोडलं तर या तांबुलात रसरशीत काही नाही. पानाशी निगडित सगळे जिंदगी से हारे हुए लोक इथे जमा झाले आहेत. पण एकत्र आले तर वेगळंच रसायन होतं. पान सोज्वळ नाही. खूप वेगवेगळ्या अफेअर्सनी तयार झालेली ही स्टोरी आहे. World Leaf Day

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld Leaf Dayगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.