गुहागर, ता. 25 : महिलांना देखील कुस्ती खेळात प्रोत्साहन मिळावे, यासाठी यंदाच्या वर्षापासून महाराष्ट्रात महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (ता. २३ मार्च) सुरु झालेल्या पहिल्या वर्षाचा अंतिम सामना सांगलीची प्रतीक्षा बागडी आणि कल्याणच्या वैष्णवी पाटिलमध्ये खेळवला गेला. या अंतिम सामन्यामध्ये वैष्णवी पाटीलला चितपट करत प्रतीक्षा बागडी हिने चांदीची गदा आपल्या नावावर केली. या स्पर्धेत ४५ जिल्ह्याचे संघ सहभागी झालेले होते. ही स्पर्धा मॅटवर खेळवली गेली. Mahila Maharashtra Kesari

सांगली-मिरज रस्त्यावर असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे हा ऐतिहासिक असा अंतिम सामना खेळवला गेला. सामन्याच्या सुरुवातीस प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या दोघी चार गुणांसहित बरोबरीत होत्या. पण अंतिम लढतीत प्रर्तीक्षाने युक्तीच्या आणि बळाच्या जोरावर वैष्णवीला चितपट करत दहा गुण मिळविले आणि मानाच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. Mahila Maharashtra Kesari

प्रतीक्षा बागडी ही सांगलीच्या तुंग गावची महिला पैलवान असून सांगलीमध्ये असलेल्या वसंत कुस्ती केंद्रामध्ये प्रशिक्षक सुनील चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली ती कुस्तीचे धडे गिरवत आहे. तसेच आजवर तिने अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई केलेली आहे. तर खेलो इंडिया या खेळात तिने रोप्य पदक स्वतःच्या नावे केलेले असून राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुद्धा उत्तम कामगिरी करत मोठ्या गटात रोप्य पदकाची कामे केलेली आहे. Mahila Maharashtra Kesari

हरियाणा येथे कुस्तीच्या सरावासाठी एकत्र असताना रुम पार्टनर राहिलेल्या सांगलीच्या प्रतीक्षाने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला पछाडत पहिली महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा आपल्या नावे केली आहे. प्रतीक्षा बागडीच्या या विजयानंतर सर्व स्तरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६८, ७२ आणि ७६ वजनी गटातील मल्ल सहभागी झाल्या होत्या. Mahila Maharashtra Kesari
