विभागीय माहिती कार्यालय, कोकण भवन, नवी मुंबई
ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात सतत बदल होत असले तरी कडाक्याची थंडी संपल्यानंतर उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात त्वचाविकार, काविळ, टायफाईड, घशाचे आजार, गोवर तसेच उष्माघात असे आजार उद्भवतात. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायांबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर दिसतात. यात शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते. Take care of health in summer


शरीराने मर्यादेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. “उष्माघात” हा त्याचाच एक प्रकार आहे. बाहेरचे तापमान प्रमाणाबाहेर वाढले की शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कोलमडते. उष्माघात झाल्यावर चक्कर येणे, मळमळ, उलट्या होणे, डोकेदुखी, दरदरून घाम फुटणे, थकवा येणे स्नायूंना आकडी येणे अशी लक्षणे दिसू लागतात. म्हणजे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरिक तापमान (104 डिग्री पेक्षा जास्त). घाम बाहेर पडत नाही त्यामुळे त्वचा गरम आणि कोरडी होते. घाम येण्याचे थांबते, नाडीची आणि श्वासाची गती वाढलेली असते, रक्तदाब सुरुवातीला वाढतो आणि नंतर कमी होतो, शरीरात ताठरता येते, हात आणि पायात आकडी (क्रॅम्पस ) येतात, मानसिक बदल होतो, चिडचिड होते, भ्रम होतो आणि कोमा म्हणजेच बेशुद्धवस्था येते आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो. हे असे क्रमाक्रमाने होते, बेशुद्धवस्था हा वयस्कांमध्ये उष्माघातचा पहिला संकेत असू शकतो. Take care of health in summer


नागरिकांनी उन्हाळ्यात स्वत:ची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, यासाठी शासकीय यंत्रणांमार्फत मार्गदर्शक सुचना प्रसिध्द केल्या जात आहेत. उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. Take care of health in summer
काय करावे
• तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
• हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
• बाहेर जातांना गॉगल्स, छत्री/ टोपी, बूट व चपलाचा वापर करण्यात यावा.
• प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी.
• उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा.
• शरीरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस (ORS), घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा.
• अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
• गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी द्यावे.
• घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
• पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
• कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
• सूर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
• पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
• बाहेर कामकाज करीत असताना अधूनमधून विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
• गरोदर, कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी.
• रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत.
• जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. Take care of health in summer
काय करू नये
• लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.
• दुपारी १२ ते ३. ३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
• गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
• बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरीक श्रमाची कामे टाळावीत.
• उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
उन्हाचा त्रास होऊ लागल्यास जवळच्या शासकीय जिल्हा रुग्णालय अथवा तालुका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा. अनेक आरोग्य केंद्रात उष्णतेचा त्रास होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची सोय करण्यात आली आहे. Take care of health in summer