माजी सरपंच, उपसरपंच करणार उपोषणामध्ये नेतृत्व
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अंजनवेल येथे आंतरराष्ट्रीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रामपंचायतीने स्कुल बस सुरू केल्या होत्या. या स्कुल बसची मुदत डिसेंबर २०२२ मध्ये संपूनही ठेकेदाराने सदर स्कुलबस आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. त्या स्कुलबस ताब्यात घेण्यासाठी अंजनवेल ग्रामपंचायत ठोस पावले उचलत नसल्याने या विरोधात माजी सरपंच यशवंत बाईत, माजी उपसरपंच आत्माराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून अंजनवेल ग्रामपंचायतीसमोर उपोषणाच मार्ग अवलंबण्यात आला आहे. Anjanvel villagers hunger strike for school bus
अंजनवेल ग्रामपंचायतीने आंतरराष्ट्रीय शाळा सुरू करण्याबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी तीन स्कुलबस दिल्या होत्या. या स्कुलबसचे आवश्यक ते भाडे ग्रामपंचायत आपल्या निधीतून खर्च करत होती. ३१ डिसेंबर २०२२ रोजी या तीनही स्कुलबस चालविण्याचा करार संपुष्टात आला. मात्र ठेकेदार अजित साळवी यांना आवश्यक त्या ठेक्याची रक्कम देण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. अशावेळी ठेकेदार अजित साळवी यांनी तीनही स्कुल बस आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. परिणामी शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे. परिणामी लांबपल्याच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी ही खर्चिक बाब ठरली आहे. Anjanvel villagers hunger strike for school bus

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे. यासाठीचा उद्देश सफल होत नाही. या पार्श्वभूमिवर माजी सरपंच यशवंत बाईत यांनी अंजनवेल ग्रामपंचायत व गुहागर पंचायत समिती यांच्याकडे पत्रव्यवहार करून ठेकेदाराने अडकवून ठेवलेल्या स्कुलबस आपल्या ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी केली होती. आज ठेकेदाराची थकलेली रक्कम ही एका स्कुलबसच्या किंमतीएवढीही नाही. असे असताना तीनही स्कुलबस अडकवून ठेवणे हे चुकीचे आहे. ग्रामपंचायतीने त्या स्कुलबस ताब्यात घेऊन त्या शाळा व्यवस्थापन समितीच्या ताब्यात द्याव्यात. शाळा व्यवस्थापन समिती पुढील शाळेसाठीच्या स्कुलबस सुरू ठेवण्यास तयार आहेत. मात्र यामध्ये ग्रामपंचायतही ठोस पावले उचलत नसून नाईलाजाने आम्हाला उपोषणाचा मार्ग धरावा लागला असल्याचे, यशवंत बाईत यांनी यावेळी सांगितले. Anjanvel villagers hunger strike for school bus
दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत अंजनवेल ग्रामपंचायतीसमोर ग्रामस्थ व विद्यार्थी पालक उपोषण करणार आहेत. हे उपोषण स्कुलबस ताब्यात मिळेपर्यंत सुरू रहाणार असल्याचे माजी सरपंच यशवंत बाईत यांनी यावेळी सांगितले. या उपोषणामध्ये यशवंत बाईत, आत्माराम मोरे, अनिल खडपेकर, विजय मिशाळ, उमेश किल्लेकर, नवनाथ कुरधुंडकर, सुदिप कडव, मंगेश बागकर, दत्ताराम पड्याळ, जयराज भुवड, स्वप्नील खडपे, ऋषीकेश गुरव आदी ९० ग्रामस्थ या उपोषणामध्ये सहभागी झाले आहेत. Anjanvel villagers hunger strike for school bus
