गुहागर येथे व्याडीमुनींनी केली स्थापना म्हणून व्याडेश्वर
गुहागर, ता. 18 : शहरातील व्याडेश्वर मंदिर हे सांकुरणा राजाने बांधले असा उल्लेख विश्वनाथ हरी पित्रे यांनी 1637 मध्ये लिहिलेल्या वाडेश्वरोदय या संस्कृत काव्यात आढळतो संपूर्ण पंचायतन असलेले हे मंदिर कोणत्या कालखंडात बांधले गेले याची ठोस माहिती मिळत नाही. परशुरामाच्या कोकण निर्मिती केल्यानंतर व्याडी नावाचे ऋषी गुहागर मध्ये राहिले होते त्यांनी या शिवलिंगाची स्थापना केल्याचे मानले जाते. म्हणूनच व्याडींनी स्थापलेला तो व्याडेश्वर म्हणून या मंदिराची ओळख झाली. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
मंदिराचा इतिहास
विश्वनाथ पित्रे यांनी लिहिलेल्या श्री व्याडेश्वरोदय या संस्कृत काव्यात एकूण 14 अध्याय आहेत. त्यापैकी 10, 11, 12 व 13 या अध्यायांमध्ये शिवलिंगाचा शोध, मंदिराची स्थापना व गुहागर गावाची रचना यासंबंधीची माहिती लिहिण्यात आली आहे. त्यातील संदर्भांप्रमाणे व्याड नावाचे एक विद्वान ऋषींना परशुरामाने रामेश क्षेत्रात म्हणजे आत्ताच्या गुहागरमध्ये आश्रम बांधण्याची आज्ञा केली. भगवान परशुरामांच्या आज्ञेनुसार व्याडी ऋषींनी आश्रम बांधला. या आश्रमात ते शिवाराधना करीत होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होवून भगवान शंकर येथे लिंग स्वरूपात प्रगटले. व्याडींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली म्हणून हे क्षेत्र श्रीदेव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. हा काळ परशुराम अवतारातील आहे. कालौघात हा आश्रम आणि शिवलिंग भूमिगत झाले. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
पुढे कलियुगाच्या प्रारंभी शककर्ता शालिवाहन राजाच्या कालखंडात सांकुरण राजा येथे वास्तव्याला आला. आज ज्या ठिकाणी मंदिर आहे तेथे जंगल होते. सांकुरण राजाच्या गायी या जंगलात चरण्यासाठी येत. त्यामध्ये एक कपिला नावाची गाय होती. या गायीचे दूध काढावयास गेल्यावर गाय दूध देत नसे. यामुळे गुराखीच या गाईचे दूध चोरून पितो असे गोशाळेच्या अधिकाऱ्यांना वाटत असे. यामुळे गुराख्याने त्या गायीच्या हालचालींवर लक्ष ठेवले ती गाय वेळूच्या बेटात जाते व तेथे एका पाषाणावर दुधाचा अभिषेक करते असे त्या गुराख्याला आढळून आले. यामुळे गुराख्याने रागाने गाईला बडवले त्याचा एक फटका त्या पाषाणालाही लागला तेव्हा त्या खडकातून रक्त वाहू लागले ही हकीकत त्याने सांकुरण राजाला सांगितली. राजाने ते पाषाण वर काढले ते एक स्वयंभू शिवलिंग होते. राजाने येथे एक भव्य दिव्य शिवमंदिर बांधले तेच हे श्री देव व्याडेश्वर मंदिर. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
अशीही एक कथा
विष्णूचा सहावा अवतार असलेले भगवान परशुरामांनी पश्चिमेचा सागर हटवून कोकण भूमीची निर्मिती केली यालाच परशुराम क्षेत्र किंवा भार्गव भूमी म्हणतात. यामुळे येथे अनेक ऋषीमुनी वास्तव्यासाठी आले. समुद्र स्नानासाठी भगवान परशुराम दररोज महेंद्र पर्वतावरून येत असत. त्यांनी भगवान शंकरांना प्रार्थना करून पश्चिम सागर तीर्थात स्नान केल्यावर मला आपले प्रत्यक्ष दर्शन घडावे व आपण येथे कायम वास्तव्य करावे अशी विनवणी केली. म्हणून भगवान महादेव येथे लिंग रुपात अवतरले. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
गुहागरचा संदर्भ
विश्वनाथ पित्रे यांच्या व्याडेश्वरोदय या काव्यात श्रीधर नावाच्या तंत्रज्ञाने गुहागर गाव बसवले यामध्ये गुह्य ऋषींचा एक संदर्भ आहे गृह्य ऋषींनी वसवलेले आगर म्हणून गुहागर. असाही संदर्भ आढळतो. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
मंदिराचा परिसर
गुहागरातील व्याडेश्वर मंदिर हे संपूर्ण काळोत्री दगडांनी बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या चार बाजूला गणपती, अंबिका म्हणजेच पार्वती, लक्ष्मी सहित नारायण, सूर्यनारायण असे पंचायतन आहे. पूर्वेकडील महाद्वाराजवळ गरुड आणि हनुमंताची स्थापना करण्यात आली आहे. तर महाद्वाराच्या समोर द्वारपाल उभे आहेत. देशामधील सर्वात मोठी नंदी ची मूर्ती असलेलं मंदिरांमध्ये व्याडेश्वर मंदिराचा समावेश होतो. पूर्वीच्या काळी मंदिराच्या चारी बाजूंनी दगडी उंच तटबंदी होती या तटबंदीला लागून धर्मशाळा होत्या आता या धर्मशाळांचे अस्तित्व संपले आहे. देवस्थानने एक प्रशस्त हॉल आणि भक्तनिवास बांधला आहे. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
देवस्थानमधील धार्मिक कार्यक्रम
वाडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा मोठा उत्सव होतो. रात्री व्याडेश्वरांची पालखी प्रदक्षिणा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य. शिवाय त्रिपुरारी पौर्णिमेला गोवेकर व्याडेश्वर मंदिरामध्ये पूजाअर्चा दीपप्रज्वलन दिव्यांची आरास, फटाक्यांची आतषबाजी, भजन कीर्तन असे कार्यक्रम करतात. व्याडेश्वर देवस्थान तर्फे श्रावण व कार्तिक महिन्यातील सोमवारी धार्मिक कार्यक्रम होतात तसेच भाद्रपद महिन्यातील पितृपंधरवड्यात प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम केले जातात. विजयादशमीच्या दिवशी सोनं लुटण्याचा कार्यक्रम व शिमगोत्सवात होम लावला जातो. Sri Vyadeshwar Temple at Guhagar
देवस्थानचे सामाजिक योगदान
व्याडेश्वर देवस्थान फंडातर्फे धार्मिक कार्यक्रमांबरोबरच स्थानिक लोककलांना व्यासपीठ मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करतं अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबवले जातात. त्याबरोबर विविध देवस्थानांच्या मंदिर जिर्णोद्धारासाठी आर्थिक सहाय्याबरोबर प्रसिद्ध विचारवंतांचे व्याख्यान, श्रीमद् भागवत सप्ताह, श्रीराम कथा सप्ताह, दासबोध पर प्रवचन, महिला किर्तन महोत्सव असे धार्मिक कार्यक्रम पार पाडले आहेत. सामाजिक उपक्रमातून फयानग्रस्तांना आर्थिक मदत, केदारनाथ बद्रीनाथ दुर्घटना, राज्यातील दुष्काळ स्थिती वेळी देवस्थानच्या वतीने आर्थिक सहाय्य, शैक्षणिक उपक्रमात चौथी सातवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मार्गदर्शन शिबिर, दहावी विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धतीचे मार्गदर्शन, आरोग्याच्या बाबत उपक्रमांमध्ये नामांकित अस्थिरोग तज्ञ, हृदयरोग निदान शिबिर, क्रीडा क्षेत्रातून शरीरसौष्ठव स्पर्धेत सहभाग, जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन ,आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला बीच कबड्डी स्तरावर शिबिर व स्पर्धांसाठी आर्थिक सहकार्य, राज्यस्तरीय मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये सहभाग, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये नमन मंडळाला ड्रेपरीसाठी, वारकरी सांप्रदाय वेदपाठ शाळेतील विद्यार्थ्यांना धोतर वाटप, बीच फेस्टिवल मध्ये सहभाग, नाट्य कलाकार जेष्ठ वयोवृद्ध भजनी बुवांचा सत्कार आदी विविध कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. Sri Vyadeshwar Temple at Guhagar