ग्रा.प.च्या ग्रामसभेत दगड उत्खनन व क्रशर विरोधात ग्रामस्थ आक्रमक
गुहागर, ता. 15 : तालुक्यातील वरवेली ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेले काळा दगड उत्खनन व खडीक्रशरमुळे नागरिकांचे घरे, बागायती यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ आक्रमक झाले होते. नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या काळी दगड उत्खनन व खडी क्रशर कायमस्वरूपी बंद करण्यात यावा तसेच ग्रा.प. ने दिलेला परवानगी रद्द करून याबाबतचा ठराव तहसिलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात यावा असे ग्रामसभेत एकमताने ठरले. Gram Sabha resolves to stop stone quarrying

वरवेली ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा सोमवारी ग्रा. पं. कार्यालयामध्ये सरपंच नारायण आगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. इतर विषयांच्या चर्चेबरोबर काळा दगड उत्खनन, खडी क्रशर बाबत गरमागरम चर्चा झाली. काळी दगड उत्खनन व खडी क्रशर बंद न झाल्यास गावाच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असाही निर्णय या ग्रामसभेत घेण्यात आला. मागील १० नोव्हेंबर २०२२ रोजी झालेल्या ग्रामसभेमध्ये काळा दगड उत्खनन व खडीक्रशर विरोधात नागरीकांना होणाऱ्या त्रासाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. याबाबतचा पत्रव्यवहार संबंधित क्रशर मालक, तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करावा असे सुचित करण्यात आले होते. परंतु, तत्कालीन सरपंच यांनी फक्त खडीक्रशरच्या मालकाला सूचना पत्र दिले. तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार का केला नाही, याबाबतही नागरिकांनी सवाल उपस्थित केला. Gram Sabha resolves to stop stone quarrying
खडी क्रशर मालकाला सूचना पत्र देऊनही यावर काहीच कार्यवाही केली नाही. खड़ी क्रशर व काळा दगड उत्खनन करत असताना मोठ्या प्रमाणात सुरुंग लावणे, मोठ्या प्रमाणात दिवसरात्र उत्खनन व वाहतुक करणे हा प्रकार सतत सुरू असल्याचे नागरिकांनी ग्रामसभेत सांगितले. त्याप्रमाणे सुरुंग लावले जात असल्याने येथील नागरिकांच्या घरांना, गोठ्याना तसेच मंदीराला याचा दणका बसून भितींना तडे जाण्याचे प्रकार सुरू आहेत. तसेच विहीर, बोअरवेलच्या पाण्याची पातळी झपाट्याने कमी होणे, शेतकऱ्यांच्या फळबागा लागवड, आंबा, काजू व इतर लागवड यांच्यावर मोठ्या प्रमाणात धुळ बसत असल्याने फळपिकावर याचा परिणाम होत आहे. याबाबत अनेक नागरिक व बागायतदार यांनी ग्रामपंचायत व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारीची दखल ग्रामपंचायतीने घेऊन याबाबतची सुचना ग्रामपंचायतीने खडीक्रशरच्या मालकाला देऊनसुद्धा काहीच कार्यवाही झालेली नाही. Gram Sabha resolves to stop stone quarrying
सतत होणाऱ्या काळा दगड उत्खननामुळे नागरिकांना याचा त्रास भोगावा लागत आहे. तत्कालीन सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांना विश्वासात न घेता खडी क्रशर व काळा दगड उत्खननाला परवानगी दिलीच कशी, असा सवालही नागरीकांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा त्रास व नुकसान होत असताना याची दखल शासनाने का घेतली नाही, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेला परवाना त्वरित रद्द करावा. खडी क्रशर व काळा दगड उत्खनन व दगड वाहतूक कायमस्वरुपी बंद करावी असा ठराव संमत करण्यात आला. ग्रा.पं. जर घराची कर आकारणी करत असेल तर आमच्या घरांना होणाऱ्या धोक्यापासुन वाचविण्याचे काम देखील ग्रामपंचायतीचे नाही का ? जर घरांची सुरक्षा ग्रामपंचायत करत नसेल तर घराची कर आकारणी करू नये, असे संतप्त ग्रामस्थांनी सांगितले. Gram Sabha resolves to stop stone quarrying

